*जागतिक मुद्रण दिन*
लोकदर्शन👉 संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट
*जन्मदिन – २४ फेब्रुवारी १३९८*
मुद्रण कलेचे जनक जोहान्स गटेनबर्ग यांचा जन्मदिन जागतिक मुद्रण दिन म्हणून मानण्यात येतो.
सन १४५५ मध्ये जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग या व्यक्तीने मुद्रणकलेचा शोध लावला. त्याने छापलेलं ४२ ओळींचं लैटिन बायबल हे जगातलं पहिलं छापील पुस्तक होय. त्यामुळेच २४ फेब्रुवारी हा गटेनबर्ग यांचा जन्मदिवस दरवर्षी जागतिक मुद्रणदिन म्हणून साजरा केला जातो.
मुद्रणकलेचा शोध हा मानवी जीवनातील महत्वपूर्ण व क्रांतिकारी शोध होय. या शोधामुळे ज्ञानाला पंख फुटले व ज्ञानाच्या प्रसाराला गती मिळाली. साहित्य प्रकाशनाला वेग आला. कालांतराने नियतकालिके निघाली. वृत्तपत्रे सुरु झाली. वृत्तपत्र हे लोकशिक्षण, सामाजिक व राजकीय प्रबोधनाचे प्रभावी साधन असल्याचे ध्यानात आल्यावर, जगभर बहुतांशी सुधारक, प्रबोधक व विचारकांनी आपापली वृत्तपत्रे सुरु केली. परिणामी जनमत घडवणाऱ्या या मुद्रित माध्यमाला पुढे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दर्जा प्राप्त झाला.
लाकडाच्या अक्षरांचे ठसे, शिळाप्रेस, शीशाच्या अक्षरांचे खिळे, स्क्रीन प्रिंटिंग, सायक्लोस्टाईल अशी मजल दरमजल करीत आज मुद्रणकला डिजिटल प्रिंटिंग या विकासाच्या उन्नत अवस्थेला पोहचली आहे.
ज्ञानवृक्षावरील छापलेल्या पानांच्या सळसळीने माणसाच्या मनात खळबळ निर्माण केली. मनाला वैचारिक खाद्य व विचारांना नवी दिशा मिळाली. माणूस अधिक विचार करु लागला. त्यातून उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती झाली.
साहित्य निर्मितीमुळे छापलेल्या शब्दाला संदर्भमूल्याचे परिमाण प्राप्त झाले. छापलेला शब्द खरा मानला जाऊ लागला. यथावकाश छपाईच्या शोधाने सर्व विषय कवेत घेतले. अवांतर व क्रमिक पुस्तकांच्या छपाईमुळे, शिक्षणाला नवसंजीवनी प्राप्त झाली. विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधांना गती आली. नवनवीन शोधांमुळे जग जवळ आले. विचारांचे आदानप्रदान सुरु झाले.
या वैचारिक क्रांतिने जगात प्रचंड उलथापालथ घडवली. औद्योगिक क्रांती, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, भारताचा स्वातंत्र्यलढा इत्यादी ऐतिहासिक घटना आणि महायुद्धां सारख्या दुर्घटनां मागे छापलेल्या शब्दांचीच मुख्य प्रेरणा होती. अज्ञानरुपी अंधकाराच्या पराकाष्ठेमुळे मध्ययुगाला तमोयुग म्हटले जाते. या तमोयुगाचं तम सरुन आधुनिक युगाचा सूर्योदय झाला.
मानवाने मध्ययुगातून आधुनिक युगात सिमोल्लंघन केले. हे सर्व छपाईच्या कले मुळे घडले. पण त्यासाठी छपाईच्या कलेचा संशोधक जोहान्स गटेनबर्ग याला प्रचंड यातायात करावी लागली हे विसरुन चालणार नाही.
जोहान्स गटेनबर्गला जयंती दिनी विनम्र अभिवादन !
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
नेट