लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕- चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शिक्षण परिषदेचे आयोजन
चंद्रपूर, ता. १८ : देशाचे आदर्श नागरिक आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुरू म्हणून शैक्षणिक कार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूर, शिक्षण विभागातर्फे दि. १६ फेब्रुवारी रोजी सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकरिता शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम, आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ‘इंडियन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्स’च्या डॉ. अभिलाषा गावतुरे आणि डॉ. प्रीति चव्हाण यांनी लहान मुलांच्या कोरोना काळातील (ऑनलाईन) शिक्षणाचा अनुभव, मंदावलेली शैक्षणिक प्रक्रिया, शिकताना आणि शिकविलेले समजून घेताना येणाऱ्या अडचणी, त्यासंदर्भांतील विविध रोगांबद्दलच्या वाढत्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल विस्तृत चर्चा केली. यानंतर खंड स्रोत केंद्र (बीआरसी), चंद्रपूरच्या माध्यमातून शिक्षण परिषद घेण्यात आली. यामध्ये विषयतज्ञ आनंद लभाने सर, वासेकर सर, अर्चना वाकडे मॅडम यांनी शिक्षकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर अखेरीस चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल यांनी शिक्षकांना उद्बोधक मार्गदर्शन केले. सदर एक दिवसीय शिक्षण परिषदेला मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नित यांच्यासमवेत सर्व केंद्र समन्वयक, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात नागेश नित यांनी विद्यार्थी गुणवत्ता अंतर्गत पालक भेट करून तशा नोंदी ठेवण्यात याव्यात असे उपस्थित शिक्षकांना सांगितले. त्याचप्रमाणे शालेय स्तरावर सुरू असलेल्या शैक्षणिक उपक्रमाबद्दल आढावा घेऊन त्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मनपा अंतर्गत ‘नवरत्न स्पर्धेचे’ आयोजन करण्याकरिता मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याशी चर्चा देखील करण्यात आली. तसेच ‘मिशन गरुड झेप’ व ‘शिक्षण दान’ या दोन्ही उपक्रमाबाबत माननीय मिताली सेठी, मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेबाबतचा उद्देश्य व उद्दिष्ट तसेच विद्यार्थी-शिक्षक यांच्याकडून असलेल्या अपेक्षा नीत यांनी अधोरेखित केल्या. नव्यानेच सुरू झालेल्या ‘मिशन ४५ दिवस’ या दि. १४ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांकरीता प्रत्यक्षपणे चालणाऱ्या स्तरनिहाय कृती कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. अध्ययन स्तर संदर्भाने केंद्रातील शाळानिहाय विद्यार्थी प्रगतीबाबतही चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुनील आत्राम यांनी केले.