लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕बंपर लकी ड्रॉ योजना भाग- २ ची महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली घोषणा
चंद्रपूर | कोविड लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दि. १२ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान घेण्यात आलेल्या बंपर लकी ड्रॉ उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभल्यानानंतर आता लसीकरण करणाऱ्यांना बक्षीस जिंकण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. बंपर लकी ड्रॉ योजना भाग- २ ची घोषणा महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली. २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान लसीकरण करणाऱ्या सर्व पात्र वयोगटातील व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येणार आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाचा टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे लसीकरण बंपर लकी ड्रॉ योजना भाग- १ मध्ये लाखावर व्यक्तीनी सहभाग घेऊन लसीकरण करून घेतले. यात भाग्यवंत ठरलेल्या व्यक्तींना २६ जानेवारी रोजी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. आता १५ ते १७ वर्ष वयोगट आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी प्रिकॉशन डोस दिला जात आहे. नव्या वर्षात तिसरी लाट सुरु झाली असून, लसीकरण वाढविण्यासाठी बंपर लकी ड्रॉ योजना भाग- २ ची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत मनपा हद्दीतील लसीकरण केंद्रावर पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस घेणारे सहभागी होऊ शकतील.
भाग्यवान विजेत्यांना प्रथम बक्षीस फ्रिज, दुसरे बक्षीस वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस एलईडी टीव्ही आणि १० मिक्सर-ग्राइंडर प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येतील. अधिकाधिक नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.