——————————————————————————–
आज 30 नोव्हेंबर २०२१ रोजी
भिमाशंकर विद्यालयाचे विज्ञान विषयाचे शिक्षक आदरणीय रमेश यशवंत सावते सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
सरांची निवृत्तीम्हणजे…
एका आदर्श शिक्षकाची..
एका निष्काम कर्मयोग्याची
एका प्रज्ञा आणि प्रतिभावंत अध्यापकाची..
33 वर्ष सेवेच्या एका वृत्ताची…
अनेकांचे मनोहर रूप घडवलेल्या मूर्तिकाराची…
अनेकांच्या जीवनात रंग भरलेल्या चित्रकाराची..
अनेक वक्ते तयार केलेल्या प्रवक्त्याची…
गरीब वस्तीत राहूनही उच्चकोटीचे स्वप्ने प्रत्यक्षात उतरणाऱ्या शिल्पकाराची..
सेवेत असताना पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान करून निष्कलंक चारित्र्य जपणारा एका व्रतस्थ शिक्षकाची
अशी अनेक बिरुदे लावली तरी ते कमी पडावेत असे व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय सर.
आज सेवानिवृत्त होत आहेत.
इ.स. १९८८ मध्ये भीमाशंकर विद्यालयात आले तेव्हापासून आतापर्यंत अविश्रांतपणे विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले. भीमाशंकर विद्यालयाच्या जडणघडणीत, संस्कृतीक व गुणात्मक विकासामध्ये सरांचा मोलाचा वाटा आहे. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा तळमळीने शिकवणार आमचा गुरुजनांचा स्टॉप होता. आपल्या सहकारी बांधवांशी सरांचे संबंध खूप सौजन्याचेआणि जिव्हाळ्याचे होते. विज्ञान विषयाचा गाढा अभ्यास आणि शिकवण्याची हातोटी अविस्मरणीय आहे. सुंदर हस्ताक्षर हा सरांचा अलंकार आहे. माझ्यासह अनेकांनी तो सुंदर हस्ताक्षराचा वारसा आम्हाला सरांकडून मिळालेला आहे. शाळेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कमवा आणि शिका यातील सहभाग, ग्रामस्वच्छता अभियान, साक्षरता अभियान यासारख्या विविध उपक्रमातील सरांचा सहभाग अविस्मरणीय आहे. एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आमच्या शिराढोण मधील विविध जयंत्या व उत्सव, धार्मिक कार्यक्रम या मधील सहभाग सरांचा उल्लेखनीय आहे. यांच्यासारखे विद्यालयीन जीवनात शिक्षक मिळणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. कारण गावाच्या विकासाचा रस्ता हा शाळेतूनच जात असतो. त्या शाळेतून घडलेले अनेक विद्यार्थी, संस्कारक्षम पिढी हे त्या गावाच वैभव असते. आणि ते अशा गुरुजनांन कडून आम्हाला मिळाले आहे.
जरी सर शासकीय सेवेतून निवृत्त होत असले तरी आमच्या अनेकांच्या ह्रदयातून सेवानिवृत्तहोणार नाहीत. कारण त्यांनी आम्हा विद्यार्थ्यावर शिराढोण सारख्या ग्रामीण भागातही मानवी जीवनमूल्यांचे शाश्वत संस्कार रुजवले. सर शिराढोण गावचे चोवीस तास शिक्षक होते. आमच्या वस्तीत राहूनही एक वेगळा आधार आणि आदर्श आमच्यासाठी निर्माण केला. अनेक गुणवंत आणि गुणी जणांना प्रेरणा देऊन सरांनी पुढील दिशा दाखवली. आयुष्यभर अनेक विद्यार्थ्यांच्या गरिबीला ठिगळे लावता- लावता
सुंदर स्वप्ने रचली. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून सरांची आदरयुक्त भीती असायची. सुंदर हस्ताक्षर, उत्कृष्ट वक्ते, उत्कृष्ट निवेदक, चित्रकार, गायन या विविध कलागुणांचे दालन म्हणजे आदरणीय सर.
शिक्षक जेव्हां सेवानिवृत्त होत असतो तेव्हा त्यांच्या सेवेचा समारोप होत असतो. पण ते जेव्हा सिंहावलोकन करतात तेव्हा त्यांच्या कृती रूपाने अनेक विद्यार्थ्यांचे सुंदर जीवन घडलेले पाहून कृतार्थ वाटत असत. तेव्हा च खरे आत्मिक समाधान मिळते, कुठल्याही क्षेत्रात नाही. सरांचे अनेक विद्यार्थी देशातल्या विविध भागात अनेक चांगल्या पदावर कार्यरत आहेत यातच खूप मोठे यश आहे.
सर आज प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. या क्षणी आमच्या मनात अनेक आठवणींनी प्रचंड गर्दी केली आहे. अनेक चढ-उतार दाखविलेल्या आयुष्याची वाटचाल आता कुठेतरी थांबणार आहे. लोभसवाण्या व निष्पाप बालपणाच्या लडिवाळ व खेळकर निर्वाज्य वाटा फार लवकर सरल्या.
तारुण्यात एक स्वप्नाळू वयात पाऊल ठेवताच एक सुंदर स्वप्न पाहिले ते ज्ञानदानाचा. सर आपण एका गरीब कुटुंबात जन्मलात. गरीबी आणि संघर्ष हातात हात घालून चालत होती. वास्तवाच्या भयान चटक्याची जाणीव फार कमी वयातच झाली आणि सुरू झाला तो जगण्याचा संघर्ष….
याच वाटेवर असताना १९८८ मध्ये शिक्षकी पेशा पत्करला आणि इमान इतबारे आजपर्यंत विद्यार्थी घडवण्याचे व ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले.कष्टकरी, शोषित, कामगार, दिनदलितांच्या पाल्याने शिकून समाज व्यवस्था बदलण्याचे कार्य केले. माणूस म्हणून जगण्यासाठी आमच्या पंखांना बळ दिलात. म्हणून या गावात तुम्हाला प्रचंड मान आणि सन्मानही मिळाला. म्हणून तर कै. माधवराव पांडागळे साहेब आपणास “गुरूजी”नावाने बोलायचे यातच सर्व काहीआहे.
सर जरी शासन निर्णय निर्णयाप्रमाणे सेवानिवृत्तीच्या ढगाआड लपला असला तरी उद्या तितक्याच प्रखरतेने नव्या रूपात, नव्या जोशात जनमाणसात सामाजिक कार्याचे रूपाने प्रकटणार आहात यात कुठलीच शंका नाही. आपण नि:पक्षपातीपणे केलेल्या कार्याचा गौरव करताना आमचे अंत:करण दाटून येत आहे.
सूर्यासारखे तळपूनी जावे,
क्षितिजा वरूनी जाताना,
दगडालाही पाझर फुटावा,
शेवटी निरोप घेताना…
आपणास व आपल्या कुटुंबियांस पुढील आयुष्य निरोगी व आनंदी जावो हीच प्रार्थना!
आपला स्नेहांकित,
उत्तम गायकवाड (मा. विद्यार्थी)शिराढोण.✒️✒️