By : Mohan Bharti
औद्योगिकरण ,नागरिकरण,नवनवीन तंत्रज्ञान ,जंगलतोड, महायुद्ध, रासायनिक खते आणि किटकनाशके , अणुबाँब चाचण्या , पृथ्वीचे वाढते तापमान इत्यादी अनेक कारणांमुळे पर्यावरणाच्या परिसंस्थामध्ये भूप्रदूषण ,जलप्रदुषण, वायुप्रदूषण यांचे प्रमाण वाढलेले आहे. यांचा गंभीर परिणाम मानवाच्या आणि पर्यावरणाच्या अस्तित्वावर होत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडलेले आहे. त्यामुळे जगासमोर एक भीषण समस्या उभी राहत आहे. आणि ती म्हणजे जागतीक तापमान वाढ होय. वातावरणातील कर्ब वायूंचे प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपाय योजना बाबत नुकतीच ग्लासको येथे संयुक्त राष्ट्रांची सीओपी-26 ही जागतीक हवामान परिषद आयोजीत करण्यात आली होती. त्यामध्ये भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी 2070 पर्यंत कर्ब वायूचे प्रमाण 0% पर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पर्यावरण हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा विषय असणार आहे. पर्यावरण वाचले पाहीजे , झाडे वाचले पाहीजे ,झाडे लावली पाहीजे असं सर्वांना वाटते परंतु त्यादृष्टीने सकारात्मक पाऊले किती जन उचलतात ? याचा विचार मात्र प्रत्येकाने करणे गरजेचं आहे. समाजामध्ये काही जन मात्र पर्यावरण चांगले राहिले , झाडे लावली पाहीजे आणि त्यांचे चांगले संवर्धन झाले पाहीजे या ध्येयाने पछाडलेले असतात. नुकतेच राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराचे वितरण झाले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये एका व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं ते नांव म्हणजे पद्मश्री विजेत्या तुलसी गौडा. या मूळच्या कर्नाटकच्या हन्नोली गावातील असून हलक्की जमातीशी संबंधित आहेत. तुलसी गौडा यांनी आपल्या कार्यकाळात तब्बल ३० हजारांहून अधिक रोपांची लागवड करत त्यांनी एक संपूर्ण जंगलच उभं केलंय. वनस्पतींच्या दीर्घ ज्ञानामुळे तुलसी गौडा यांना ‘एनसायक्लोपेडिया ऑफ द फॉरेस्ट’ असं म्हटलं जातं. वयाच्या १० व्या वर्षापासून त्या हे काम निस्वार्थपणे करत आहेत. पर्यावरण संवर्धनामध्ये त्यांनी दिलेलं योगदान खूप मोलाचे आहे.
झाडे लावून पर्यावरण संवर्धनाच व्रत घेतलेला व अशाच ध्येयाने झपाटल्या सारखा काम करणारा पण दुर्लक्षित एक 54 वर्षाचा तरुण आपल्या महाराष्टा मध्ये ही आहे आणि तो म्हणजे भगवान गोविंदराव नागरे. बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील खळेगांवचा राहणारा. गेल्या 10 ते 12 बारा वर्षापासून झाडे लावण्यासाठी जिवाचे रानं करतोय. त्यांनी त्यांच्याच गावापासुन फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रजातीचे झाडे लावली आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबा ,सिताफळ ,नीम या प्रजातींचे झाडे आहेत. रस्ता दुतर्फा झाडे लावण्यासाठी सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात खूप खस्ता खाव्या लागल्या. तरीही ते मागे हटले नाही. आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या नंतर त्यांनी स्वखर्चाने मोठ्या प्रमाणात रस्ता दुतर्फा झाडे लावली आहेत . ती झाडे केवळ लावलीच नाही तर पोटच्या मुलांप्रमाणे त्याचा सांभाळ केला. जवळच्या नदी ,नाल्यातून पाणी सायकल वा डोक्यावर आणून त्या झाडाला टाकत राहिला. तरी ही मात्र तो गांवासाठी वेडाच होता. स्वतःच्याकुटुंबाकडे , घराकडे दुर्लक्ष करून झाडे जगले पाहिजे केवळ या एकाच हेतूने तो वेड्यासारखं काम करत राहिला.
“दुरुन डोंगर साजरे ” या म्हणी प्रमाणे गावातील लोक वागले पण कोणीही त्याच्या कार्यामध्ये सहभागी झाले नाही किंवा कोणी मदतही केली नाही. त्याला मात्र या कशाचीही गरज नव्हती. तो केवळ तेव्हढ करून थांबला नाही. तर खळेगांव या गावाच्या उत्तरेला आईच्या माळ (गावाचे दैवत असणाऱ्या देवीचे मंदिर )या नांवाने महसूल विभागाची 23 हेक्टर उजाड जमीन होती. त्या ठिकाणी मंदिरा लगत, तीन वर्षापूर्वी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्राम पंचायतने 2.5 हेक्टर क्षेत्रावर झाडे लावली होती परंतु पहिल्याच वर्षी त्यातील अर्ध्या पेक्षा झाडे ही अवैध चराई व संबधीत विभागाचे दुर्लक्ष मुळे नष्ट झाली. परंतु भगवान नागरे यांनी मात्र त्या जागेचा ताबा घेउन त्या ठिकाणी आंबा ,सिताफळ ,हनुमानफळ ,चिकू ,पेरू यासारखी 400 ते 500 फळझाडे स्वखर्चाने लावली, त्यांना पाणी देऊन ,त्याचे संगोपन आणि संवर्धन केले. त्या उजाड माळरानावर आज मात्र नंदनवन फुलले आहे. यासाठी मात्र त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. अवैध चराई करणाऱ्या लोकांना त्यांना तोंड द्यावे लागले ,झाडाला पाणी देण्यासाठी ग्रामपंचायत सोबत झगडावे लागले. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नलीकेतील वाया जाणारे पाणी सुध्दा सहज मिळाले नाही त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. पण त्यांचे काम मात्र अविरतपणे सुरूच होते. पोटच्या पोरा प्रमाणे वाढलेली झाडे ,अवैध चराई मुळे खराब होऊ लागली तेंव्हा मात्र त्यांनी बायकोचे दागिने विकून संपूर्ण 2.5 हेक्टर जागेला तारेचे कंपाउंड केले. त्यामुळे आज रोजी त्या ठिकाणी 1000 विविध प्रजातीचे फळझाडे माळरानावर मोठ्या दिमाखात उभी आहे. केवळ तिसऱ्या वर्षीच त्या फळबागेमध्ये आंबा ,चिकू ,सीताफळ ,हनुमानफळ या झाडाला फळे लागली आहे. त्याच बरोबर या आणखी 5 हेक्टर क्षेत्रावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रजातींच्या 2000 पेक्षा जास्त रोपाची लागवड करण्यात आली असून त्याचेही संगोपन ते करत आहेत, केवळ निस्वार्थ भावनेने . हे एका रात्रीत सहजा सहजी झाले नाही ,त्यासाठी भगवान नागरे यांना खूप कष्ट सोसावे लागले. कित्येका सोबत त्यासाठी वैरत्व पत्कारावे लागले. पण तरी सुध्दा ते मागे हटले नाही. याकामी त्यांना त्यांच्या पत्नी आणि मुलांनी खंभीरपणे साथ दिली. मोलमजुरी करून पत्नी घरांची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांना दोन मुलं असून ते शिक्षण घेत आहे. भगवान नागरे हे एक भुमीहीन मजूर आहे. त्यांचेकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. त्यांच्या दोन बायपास सर्जरी झालेल्या आहे. स्वतः च्या आयुष्याची घटकांभर ही शाश्वती नसतांना सुध्दा येणाऱ्या पिढ्यासाठी झाडे लावून त्यांना शुद्ध ऑक्सिजन देऊन सदृढ पिढी घडविण्याचे काम मात्र ते निरंतर करत आहे.
ज्यांच्या भरवश्यावर वातावरणातील कर्ब वायुचे प्रमाण कमी करण्याचे आश्वासन देशाच्या सन्मानिय पंतप्रधान यांनी दिले आहे ते भगवान नागरे सारखे शिलेदार मात्र कुटुंब वाऱ्यावर सोडून झपाटल्यासारखे काम करत आहे. तरी पण ,आज पर्यंत शासन दरबारी मात्र ते कायम उपेक्षितच आहे. त्यांच्या कामाची साधी दखल घेण्याची तसदी कोणीही घेतलेली नाही. लोकप्रतीनिधी कडे चकरा मारून सुध्दा कोणीही इकडे फिरकले सुध्दा नाही.
या लेखाद्वारे जिल्हयातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी , विविध वृतपत्राचे सन्माननीय प्रतिनिधी आणि वन व पर्यावरण सारख्या विभागाला विनंती करण्यात येत करण्या येत आहे की , आपण या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे काम पाहू शकता. त्याबरोबर आपण या लेखाला प्रसिद्धी देऊन भगवान नागरे यांचे कार्य शासन दरबारी पोहचुन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान व्हावा. यासाठी सर्व वृतपत्राचे सन्माननीय प्रतिनिधी यांनी हा लेख आपल्या वृतपत्रामध्ये प्रसिद्ध करावा. त्यामुळे जे महान कार्य त्यांनी हाती घेतलं आहे, त्यासाठी त्यांना आणखीन बळ मिळेल. त्याच बरोबर वन व पर्यावरण संबधीत एखादे काम त्यांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मिळवून देण्यात सहकार्य करावे ही विनंती. हीच अपेक्षा !