लोकदर्शन 👉 *राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* – लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने नागपूर – चंद्रपूर महामार्गावरील वरोरा येथील ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर आसपासच्या अन्य जिल्ह्यांतील शहरी व ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळेल, असे प्रतिपादन चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी केले. उपजिल्हा रुग्णालय वरोरा अंतर्गत ट्रामा केअर युनिट, अस्थीरोग शस्त्रक्रिया गृह, नेत्ररोग विभाग, नेत्र शल्यक्रिया गृह व सामान्य शस्त्रक्रिया गृहाच्या लोकार्पण सोहळ्यात उद्घाटनपर प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रतिभा धानोरकर होत्या.
व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी हेमचंद कन्नाके, तहसीलदार रोशन मकवाने, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही. कुंभे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.गोवर्धन दुधे, मुख्याधिकारी गजानन भोयर, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळू मुंजनकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंकुश राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे, न.प.चे माजी सभापती छोटुभाई शेख, डॉक्टर सेलचे डॉ. हेमंत खापणे , उपजिल्हा रुग्णालय आमदार प्रतिनिधी सुभाष दांदडे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
खासदार धानोरकर पुढे म्हणाले की, वरोरा उपजिल्हा रुग्णालयात सर्वात जास्त ओपीडी आहे. कोरोना कालावधीत येथील वैद्यकीय अधिकारी व चमुंनी नागरिकांसाठी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही. ट्रामा केअर सेंटरची इमारत तयार झाल्यानंतर शासन दरबारी वैद्यकीय अधिकारी व अन्य भरत्या झाल्या नसल्याने ट्रामा केअर युनिट लोकार्पणासाठी जनतेला बरेच दिवस वाट पाहावी लागली. ट्रामा केअर सेंटर प्रायोगिक तत्त्वावर चालविण्याचा प्रयत्न केला. यासाठी टेलिमेडीसीन सेंटरचाही आधार घेऊन रुग्णांना योग्य दिशानिर्देश करण्यात आले. त्यासोबतच ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यावरही जोर दिल्या गेला. महामार्गावर अपघात झाल्यानंतर त्यावेळी रुग्णांच्या जीवनासाठी ट्रामा केअर गोल्डन मोमेन्ट असतो व या साठीच ट्रामा केअरची आवश्यकता असते. एकदा वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाला की ती जागा भरण्यात फार वेळ लागतो त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांचे निवृत्तीचे वय वाढवून ६५ वर्षे करायला हवी, तसे निवेदनही आरोग्य मंत्री यांना देऊन पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी सांगितले. आगामी काही दिवसांत ट्रामा केअर सेंटर समोरच ५ एकर परिसरात १०० बेडच्या रुग्णालयाचे भूमिपूजन होऊन लवकरच नवीन वास्तु उभी राहण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार धानोरकर म्हणाल्या की, ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण झाले असून यात सुरू झालेल्या अस्थीरोग शस्त्रक्रिया गृह, नेत्र शस्त्रक्रिया गृहासाठी लागणाऱ्या सामुग्री साठी निधी कमी पडू देणार नाही. आमदार निधीतून शक्यती मदत प्रदान करण्यात येईल.
आपल्या प्रास्ताविकात डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले की, स्थानीक खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या अथक परिश्रमाने वरोरा येथील ट्रामा केअर तसेच पजिल्हा रुग्णालयात अस्थी शल्यक्रिया व नेत्र शल्यक्रिया यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून तालुक्यातील जनतेने या सुविधेचा लाभ घ्यावा. मोठ्या शस्त्रक्रियेसाठी रूग्णांना लागणारा खर्च एबीपीएमजेएवाय तथा एमजेपीजीवाय योजनेचा लाभ घेता येईल. वरोऱ्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांची भटक़ती थांबेल, असे त्यांनी नमूद केले. वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील इमारत जूनी असल्याने तिथे १०० बेडचे रूग्णालय बांधणे शक्य नसल्याने खासदार, आमदार यांच्या प्रयत्नातून ५ एकरची नवीन जागा उपलब्ध झाल्याने शहरात लवकरच नवीन १०० बेडचे रुग्णालय नागरिकाच्या सेवेत दाखल होईल, असेही ते म्हणाले.
सुरवातीला मान्यवरांनी
महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमात भोजराज झाडे, सुनील वरखडे, गुरूदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी रुपलाल कावळे, सदभावना एकता मंचाचे अरुण उमरे, आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने, पत्रकार बाळू भोयर, प्रवीण खिरटकर, डॉ. प्रवीण मुधोळकर, प्रवीण गंधारे, प्रदीप कोहपरे, लखन केशवानी, हितेश राजनहिरे इ.उपस्थित होते.
सूत्रसंचालन सोनाली रासपायले यांनी केले. आभार सहा.अधिसेविका वंदना बर्डे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहाय्यक एस. एन. येडे, सहायक अधीक्षक जी. ए. तुमराम, दीपक खडसाने, आरती बैस, विजया रुईकर, तनिष्का खडसाने, डॉ. प्रियंका शेलवटकर, डॉ.अंभोरे, गोविंद कुंभारे, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वृंद आदींनी परिश्रम घेतले.