लोकदर्शन 👉 मोहन भारती
——————————————–
मुंबई:हिंदुत्व आता खऱ्या अर्थाने धोक्यात आहे. हिंदुत्वाची शिडी करून जे वर सत्तेत गेले आहेत ते सत्ता राखण्यासाठी इंग्रजांची निती वापरतील. त्यांचा हेतु साध्य होऊ देऊ नका, असे सांगतानाच मराठी माणसाची भक्कम एकजूट दाखवा आणि त्याचवेळी मराठी अमराठी हा भेद गाडून हिंदुत्वही वाढवा, असे महत्त्वाचे विधान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात केले,
मराठी तितुका मेळवावा याप्रमाणे हिंदुत्व सुद्धा वाढवा’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. हिंदुत्वाची शिडी करून जे वर चढले आहेत ते इंग्रजांची नीती अवलंबू शकतात. तोडा, फोडा आणि राज्य करा, असा त्यांचा हेतु असेल तर त्यापासून आपल्याला सावध व्हावं लागेल, असे सांगताना, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीय आहे. घराबाहेर आमच्यासाठी देश प्रथम आहे, असे ठाकरे म्हणाले. तुमची पालखी वाहत नाही म्हणून शिवसैनिकांना तुम्ही आज भ्रष्टाचारी म्हणत आहात पण आम्ही तुमचे नाही तर हिंदुत्वाचे, भारतमातेचे भोई आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. वाईट काळात तुम्हाला शिवसेना चालली आता हर्षवर्धन पाटील चालतात. कुटुंबावर, सदस्यांवर टीका हे हिंदुत्व नाही तर नामर्दपणा आहे, अशी तोफही ठाकरे यांनी भाजपवर डागली.