लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
-🔸 हस्तांतरण कारवाई लवकर करण्याचे उपमहापौर राहुल पावडे यांचे निर्देश
चंद्रपूर, ५ ऑक्टोबर : हुडको वसाहत लवकरच नियमित होणार असुन वसाहतीतील क्वार्टर्स रहिवाश्यांना हस्तांतरण करण्याची कारवाई शीघ्र गतीने करण्याचे निर्देश उपमहापौर श्री. राहुल पावडे यांनी दिले आहेत. हुडको वसाहतीतील क्वार्टर्स रहिवाश्यांना हस्तांतरित करण्यासंदर्भात नगरसेविका सौ. कल्पना बगुलकर यांच्या माध्यमातून उपमहापौर श्री. राहुल पावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक २९ सप्टेंबर रोजी मनपा कार्यालयात घेतली.
दुर्बल घटंकांकरीता घर बांधणी योजनेअंतर्गत ‘हुडको वसाहत’ निवासी संकुल महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आले होते. करारनाम्यानुसार ही संकुले आता लाभार्थ्यांना हस्तांतरीत करावयाची आहेत. याकरीता अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पाहणी करावी, प्रक्रियेची पुर्तता करून गाळेधारकांना लवकरात लवकर ताबा देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत सन १९९९ मध्ये हुडकोच्या मदतीने दुर्बल घटकातील कमी उत्पन्न असणाऱ्या नागरीकांना निवासास्तव अतिशय कमी किमतीत गाळे उपलब्ध करून देण्यात आले होते. शासकीय जागेवर बांधण्यात आलेल्या या ३१ निवासी इमारतींमध्ये २४८ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले होते. यावेळी झालेल्या करारनाम्यानुसार १५ वर्षापर्यंत पूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर रजिस्टर विक्री पत्रान्वये सदर गाळ्यांचा मालकी हक्क गाळेधारकांना देण्यात येणार आहे. आता १५ वर्षे पुर्ण झाली असल्याने व गाळेधारकांनी निश्चित केलेल्या हप्त्यांचा भरणा केल्या असल्याने त्यांना मालकी हक्क देण्याच्या प्रक्रियेची पूर्तता शीघ्र गतीने व्हावयास हवी असा सूर बैठकीत उमटला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. विपीन पालीवाल, उपायुक्त श्री. अशोक गराटे, उपअभियंता श्री. विजय बोरीकर, नरेंद्र बोभाटे, सुरेश माळवे उपस्थित होते.