फिनिक्स तर्फे ‘अजून मी हरलो नाही’ व ‘मी मनमोर’ कविता संग्रहाचे प्रकाशन
चंद्रपूर :
कवी आणि कविता यांची नाळ एकरुप असावी लागते, तेव्हाच अस्सल कविता जन्मास येते. आजची वर्तमानाची कविता ही तुकारामाच्या गाथेसासारखी अभंग असावी असे मत व्यक्त प्रसिद्ध कवी व वक्ते डॉ.धनराज खानोरकर यांनी व्यक्त केले. फिनिक्स साहित्य मंच तर्फे आयोजित ‘आजची कविता वर्तमानाची आव्हाने पेलण्यास समर्थ आहे’ या विषयावर परिसंवादात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
प्रयोगशील प्रशासकीय अधिकारी व कवी धनंजय साळवे यांचा ‘अजून मी हरलो नाही’ कवितासंग्रह व कवी नरेशकुमार बोरीकर यांच्या ‘मी मनमोर’ या चारोळीसंग्रहाचे थाटात प्रकाशन यावेळी पार पडले. अध्यक्षस्थानी बल्लारपूरचे कवी सुधाकर कन्नाके, तर उद्घाटक म्हणून गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेश पांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ उपस्थित होते.
कवी धनंजय साळवे व कवी नरेशकुमार बोरीकर यांची कविता जगण्याची अस्सल अनुभूती आहे. सामाजिक वर्तमानाचा आशय लयदार पद्धतीने अभिव्यक्त करत साहित्य क्षेत्राला समृद्ध करणारी आहे. ग्रामजाणिवा आणि मनाची गुंतागुंत प्रभावीपणे अधोरेखित करणारी ही दमदार कविता दखलपात्र असल्याचे प्रतिपादन युवाकवी व सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर यांनी केले. फिनिक्स साहित्य मंच आयोजित कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख भाष्यकार म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे संचालन कवी विजय वाटेकर यांनी केले. प्रास्ताविक कवी सुरेंद्र इंगळे तर आभार धर्मेंद्र कन्नाके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता फिनिक्स साहित्य मंचाचे बी.सी.नगराळे, ईश्र्वर टापरे, जयवंत वानखेडे, सुनिल बावणे, दुशांत निमकर, संभा गावंडे, राजेंद्र घोटकर, अरुण घोरपडे, पंडीत लोंढे, चंद्रशेखर कानकाटे, नरेंद्र कन्नाके, वैशाली दिक्षीत, शितल धर्मपुरीवार, संतोषकुमार उईके, मिलेश साकुरकर यांनी परिश्रम घेतले.
••••
फिनिक्सचे साहित्य, सेवाव्रती पुरस्कार प्रदान
फिनिक्स साहित्य मंचाचे वार्षीक पुरस्कार कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. यात फिनिक्स प्रतिभा पुरस्कार ‘माह्यी परदेस वारी’ प्रवासवर्णनासाठी गोपाल शिरपूरकर, ‘कलाटणी’ या कांदबरीसाठी नितीन जुलमे, ‘आम्ही कोणत्या देशात राहतो ?’ या कवितासंग्रहासाठी प्रब्रम्हानंद मडावी, ‘आंबिल’ कवितासंग्रहासाठी सुनिल पोटे यांना प्रदान करण्यात आला. फिनिक्स सेवाव्रती पुरस्कार आदर्श शिक्षक राजेंद्र परतेकी तर विशेष रक्तदानासाठी हरिश ससनकर यांना देण्यात आला. फिनिक्स मित्र पुरस्कार कलावंत ललीत चिकाटे व कवयित्री मिना बंडावार यांना सन्मानित करण्यात आले.
•••••