झाडीपट्टी रंगभूमीचे निष्ठावंत सेवक प्रा. डॉ. शेखर डोंगरे

By : प्रा. राजकुमार मुसणे

गडचिरोली:
झाडीपट्टी रंगभूमीवर नाट्यकलेची आराधना करीत श्रमजीवी रसिक मायबाप प्रेक्षकांचे तब्बल पाच दशके मनोरंजन व प्रबोधन करणारा किमयागार म्हणजेच प्रा. डॉ. शेखर डोंगरे सर होय. प्रा.शेखर डोंगरे यांनी वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने वैदर्भिय जनमानसाच्या मनावर दीर्घकाळ गारूड निर्माण केले असून ते रंगभूमीवरील एक अद्भुत नाट्य रसायनच आहे. रंगमंचावर पाऊल ठेवताच प्रेक्षक स्वाभाविकपणे हसायला लागतात ,ही जादूभरी किमया त्यांच्या छबीने निर्माण केली आहे. अध्यापन,संशोधन,अभिनय, संगीत,दिग्दर्शन, निर्माता अशा एकापेक्षा अधिक क्षेत्रात श्रेष्ठत्व सिद्ध करून लौकिकास पात्र ठरणारे शेखर डोंगरे सरासारखे बहुआयामी यशस्वीतेचे मानकरी विरळाच. स्वतःचे अस्तित्व सिद्ध केल्यानंतरही आम्हा अनेक उदयोन्मुख कलावंतांनाही . विविध न प्रशिक्षण मार्गदर्शनाने अनेक नाट्यलेखक, कलावंताना प्रोत्साहित करून मार्ग दाखवित घडविण्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.

आंगीक,वाचिक, सात्विक व आहार्य अशा अभिनयाने प्रेक्षकप्रिय ठरलेल्या शेखर डोंगरे यांच्या वेगवेगळ्या भूमिका साकारताना त्यात एकसुरीपणा जाणवत नाही ,हे विशेष. आपल्या वाटेला आलेल्या वेगवेगळ्या भूमिकांना त्यांनी रसिक प्रेक्षकांना रिझवत मने जिंकली.अर्थातच एक बहुरूपी ,बहुगुणी असा हा जनप्रिय कलावंत आहे. स्वयंतेजाने झळकणारा हा अनमोल हिरा आहे. सर्जनाची क्षितिजे न्याहाळणाऱ्या व्यासंगी नटाने चौफेर नजर ठेवत स्वतः व चंद्रकमल प्रेसला अपडेट ठेवले. नाट्य कलाविषयक निष्ठा सांभाळत उत्तमोत्तम नाटके चंद्रकमलच्या माध्यमातून रंगभूमीवर आणत के.आत्माराम व इतर सह कलावंतांच्या प्रभावी सादरीकरणामुळे प्रयोग संख्येचा उच्चांक ही कायम ठेवण्यात यशस्वी ठरले. झाडीपट्टी रंगभूमीला व्यावसायिक रूप देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्णच आहे. किंबहुना झाडीपट्टी रंगभूमीचा व्यावसायिक दृष्ट्या चिकित्सक अभ्यासही करून रोजगाराभिमुखता सिद्ध केली आहे. शैक्षणिक सामाजिक व नाट्य क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंताचा झंझावाती प्रवास सर्वश्रूत आहे. निश्चितच या उज्वल कारकिर्दीमुळेच त्यांना दुसऱ्या झाडीपट्टी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमानही प्राप्त झाला. तत्वतः त्यांच्या सेवापुर्ती निमित्ताने प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. जनबंधू मेश्राम व डॉ. धनराज खानोरकर यांनी संपादित केलेला ‘नव्वोदत्तर झाडीपट्टी रंगभूमी: चिंतन आणि चिकित्सा’ हा प्रा. डॉ. शेखर डोंगरे यांचा गौरव ग्रंथ गोंडवाना विद्यापीठासह अन्य विद्यापीठांमध्ये संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासार्थ आहे, हे विशेष.
पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील 0वैनगंगा नदी काठावरील छोट्याशा मोहुरणा ता. लाखांदूर या गावात शेतकरी कुटुंबात २६ मार्च १९६३ ला जन्मलेल्या सुपुत्राने प्रतिकुलतेवर मात करीत उत्तुंग झेप घेतली .शेखर अर्थात् चंद्र. या मोहक, आकर्षक चंद्राने शीतल छायेने रसिकांना मोहित केले.
ग्रामीण पार्श्वभूमीत जन्मलेल्या शेखर यांना
लहुजी डोंगरे ,केशव डोंगरे- यांचा प्रेरक वारसा व विविध बाळकडू मिळाल्याने लहानपण पासूनच मन संस्कारी होत गेले.पुढे प्रा.रंगारी, बाबुराव कावळेयांच्या योग्य मार्गदर्शनामुळे दिशा मिळाली.५ व्यां वर्गात असताना म्हणजे १० वर्षापासूनच अभिनय करण्यास प्रवृत्त झाले. घरातील संस्कार व शिस्त ही प्रवृत्ती त्यांच्या अंगवळणी पडली. खडतर पायवाटेने शैक्षणिक वाटचाल परिश्रमपूर्वक यशस्वीरित्या पूर्ण करून उच्च शिक्षणानंतर सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे प्राध्यापकी पेशा स्वीकारला.
वयाच्या दहाव्या वर्षापासून चेहऱ्याला रंग फासून नाटकात प्रथम भूमिका करणाऱ्या या कलावंताने विविध हौशी व व्यावसायिक नाट्यमंडळाच्या माध्यमातून चार हजार पेक्षाही अधिक नाटकातून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
शालेय- महाविद्यालयीन जीवनातच वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या कलावंताने अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे.
महाविद्यालयीन जीवनातील ‘हा स्पर्श मायेचा’ या नाटकापासून ते ऐतिहासिक , पौराणिक नाटकात झाशीची राणी या नाटकातील फादरची भूमिका,एकच प्याला नाटकातील तळीराम, पापीपुत्र, का रक्त पिता गरिबाचे, भलतच घडलं वेडाच्या भरात ते महात्मा फुले यांच्या ‘ तृतीय रत्न’ नाटकातील विदुषक अशा विविध नाटकातून चरित्र नायक ,खलनायक, सहयोगी कलावंत ,विनोदी अशा विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. प्रा .शेखर डोंगरे यांच्या नाटयप्रयोगातील भूमिका पाहताना चकित- संभ्रमित- थक्क होण्याचा अनुभव प्रस्तुत लेखकासही आहे.सालासार प्रोडक्शन निर्मित ‘पहिलं पाऊल जीवनाचं,निबंध या चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. अर्थातच नाट्य व चित्रपट या क्षेत्रातील त्यांचे पदार्पण आणि आपल्या अभिनयाने त्यात उमटविलेला अमिट असा ठसा वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्या कर्तुत्वामुळेच गडचिरोली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विनोदी अष्टपैलू कलावंत म्हणून सन्मानित , समाजकल्याण संचालनालय महाराष्ट्राच्या जिल्हा दारूबंदी विभागामार्फत सन्मानित ,ग्रामीण सांस्कृतिक रंगभूमी नागपूर जिल्हा चंद्रपूर तर्फे विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयाने सन्मानित, उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शन व अभिनयामुळे सन्मानित ,२०, २१ऑक्टोंबर २००३ अखिल झाडीपट्टी नाट्य अकादमीचे दुसरे झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई उत्कृष्ट नाट्य कलावंत म्हणून सन्मान, झाडीपट्टीतील रंगभूमीतील योगदानाबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने सन्मानित पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई तथा आदिवासी जनजागृती भोवतीचे शिक्षण संस्था कुरुड तर्फे उत्कृष्ट नाट्य कलावंत म्हणून सन्मानित झाडीपट्टी रंगभूमी विषयी विविध ठिकाणी मार्गदर्शनकेले आहे.सर्च फाउंडेशन गडचिरोली मार्फत रक्तदाब, शुगर आणि लकवा या आजारावरील लघुपटाचे दिग्दर्शन व अभिनय त्यांनी केला आहे.अर्थातच प्रा.डोंगरे यांनी वैविध्यपूर्ण अभिनयाच्या भूमिकांच्या छटांनी रसिक मनावर गारुड निर्माण केले आहे . विनोदी कलावंत म्हणून हास्यसम्राटाने विलक्षण मोहोर उमटवली आहे.

हार्मोनियम व आर्गन वादक, उत्तम गायक ,भूमिकेशी एकरूप होत पात्र जिवंत करणारा, भूमिका तन्मयतेने करून प्रेक्षकाना समरसून टाकणारा नटश्रेष्ठ शेखर डोंगरेच. गुणी कलावंत, प्रयोगशील दिग्दर्शक,उत्तम व्यवस्थापक या मुळे आजही अव्वल स्थानी आहेत.13८ वर्षाच्या झाडीपट्टी रंगभूमीच्या इतिहासात अनेक लहान मोठे प्रेस निर्माण झाल्या आणि विरून गेल्या पण चंद्रकमल थिएटर मात्र व्यावसायिक रंगभूमीवर स्वतःची ठळक प्रतिमा निर्माण करीत अग्रेसरच आहे . समाजातील गंभीर विषय, कसदार कलावंतांचा जबरदस्त अभिनय, प्रभावी सादरीकरण, प्रसंगानुकूल नेपथ्य, घटना प्रसंगांची उत्कृष्ट मांडणी,गतिमानता, नाट्य आशयाशी निगडित संगीत साथ आणि हसून लोटपोट करणारा प्रसंगनिष्ठ विनोद या वैशिष्ट्यामुळे झाडीपट्टी रंगभूमीत चंद्रकमल थिएटरने लौकिक प्राप्त केला आहे.
विशिष्ट पालूपदांचा विलक्षण उच्चार, प्रभावी संवाद फेक , टाइमिंगचा समर्पक वापर, अनोखी शैली, कायिक, वाचिक, आंगिक, समयोचित उत्स्फूर्त अभिनयाने झाडीपट्टीच्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला हा बहुगुणी कलावंत आहे.तोच तो पणा व उथळ आचरटपणाच्या झाडीपट्टी रंगभूमीची कोंडी फोडत व्यासंगी, परिश्रमी ,चौफेर ज्ञान असणाऱ्या या कल्पक , गतिमान, परिवर्तनाचा ध्यास अंगीकारलेल्या प्रयोगशील दिग्दर्शकाने ढाचा बडलवित झाडीपट्टी रंगभूमीला वेगळे परिमाण दिले.चतुरस्त अभिनयाने कर्तृत्वाची पताका डौलाने फडकवणारा हा कलावंत रसिकांना आकृष्ट करण्यात सदोदीत यशस्वी ठरला. नाट्यकलेला ज्ञानाची, विचाराची, परिश्रमाची जोड देऊन तिच्या प्रगतीसाठी धडपडणाऱ्या प्रा. डॉ. शेखर डोंगरे या कलावंतांने जवळपास पाच पिढ्यांच्या मनोरंजनाने आणि प्रबोधनाने अभिरुची संपन्न करण्यातील त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे. कलात्मक आयाम देणारा त्यांचा एकूण प्रवास सुवर्णपर्व ठरावा असाच .आपल्या चतुरस्र अभिनयाने मनमुराद हसविणारा हा किमयागार साहित्य ,संगीत, नाट्यकलेंनी संपन्न आहे. बोलका चेहरा, कसदार आवाज ,आकर्षक शरीरयष्टी , भाव व्यक्त करणारे तेजदार डोळे, सादरीकरणाची जाणकारी आणि लकबी यामुळे रंगमंचावर ते आले की सर्वांचे लक्ष वेधून घेतात ,असा हा बहुरंगी भूमिका साकारणारा नटसम्राट , दिग्दर्शक,नाट्यनिर्माता ,रंगकर्मींना घडविणारा समाजशिक्षक बहुगुणी कलावंताचे एकूण कार्य प्रशांत दामले, प्रभाकर पणशीकर यांच्या तोडीचे आहे.
वैशिष्ट्यपूर्ण मुद्राभिनय व देहबोलीने झाडीपट्टी रंगभूमीत विनोदी भूमिका साकारणाऱ्या
कलावंताच्या मांदियाळीतील रसिक प्रेक्षकांच्या ओठावरील अग्रणी नाव म्हणजेच मा. शेखर डोंगरे होय. के.आत्माराम व प्रा.शेखर डोंगरे ही जोडी विनोदी कलावंत म्हणून झाडीपट्टीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ग्रामीण भागातील अल्पशिक्षितांना त्यांच्याच बोलीभाषेतून हलक्या- फुलक्या विषयातून विनोद सादर करून त्यांच्या मनावरील ताण हलका करत खुर्चीला खिळवून ठेवतात. या विनोदवल्लीने
प्रेक्षकाला हसवत हसवत त्यांचे समाज प्रबोधनही करीत असतात.
सेवानिवृत्तीनंतरही सातत्याने कलानिष्ठा जोपासत रंगदेवतेची आराधना करीत जनसामान्य प्रेक्षकांचे रंजन आणि प्रबोधन करणारे लक्षवेधी असे सर्जनशील नाट्यवर्ती अष्टपैलू कलावंत म्हणजेच प्रा. डॉ. शेखर डोंगरे होय. झाडीपट्टी रंगभूमीवर नाममुद्रा कोरणाऱ्या बहुआयामी ,कल्पक, प्रयोगशील रंगकर्मीची रंगमंचीय साधना ही यशस्वी असून प्रेरणादायी वाटचाल निश्चितच ऐतिहासिकदृष्ट्या मौलिक आहे.२६ मार्च सरांचा वाढदिवस,प्रा .डॉ.शेखर डोंगरे सरांना ६२ व्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुरारोग्य लाभो, याच खूप खूप शुभेच्छा..!

प्रा. डॉ. राजकुमार मुसणे, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here