लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– महायुती सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा केवळ पोकळ घोषणांचा पाऊस पाडणारा अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प आहे. सर्व सामान्य जनतेच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यात हे सरकार अयशस्वी ठरले असून जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, लाडकी बहिण योजनेचे २१०० रुपये दरमहा मदत नाही, पायाभूत सुविधांसाठी ठोस उपाययोजना नाहीत. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतमालांचे कोसळलेले भाव, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, पिकविम्याच्या थकलेल्या रक्कमा, कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, महिला सुरक्षितता व सबलीकरणाकडे दुर्लक्ष, अर्धवट घरकुलांचे प्रश्न, जल जीवन ची अर्धवट राहिलेली कामे, खुंटलेला औद्योगिक विकास यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर कुठलेही ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. केवळ शहरी भागावर राज्याची तिजोरी रिकामी करण्यात येत आहे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले आहे. चंद्रपूर, गडचिरोली या दुर्गम, आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त जिल्हाच्या विकासाला चालना देण्यासाठी ठोस निर्णय नाहीत. त्यामुळे हा अर्थसंकल्पात केवळ पोकळ घोषणांचा पाऊस असून त्या पूर्ण होतील याची शाश्वती कमी आहे. एकंदर अत्यंत निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली आहे.