‘ बायको चढली डोक्यावर ‘ : लाडावलेल्या पत्नीचा मिजास दर्शविणारे चंद्रकमल थिएटरचे नाटक

By : प्रा. राजकुमार मुसणे
गडचिरोली :

चंद्रकमल थिएटर्स सिंदेवाही/वडसा निर्मित, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा.डॉ.शेखर डोंगरे दिग्दर्शित, के .आत्माराम यांच्या मार्गदर्शनात रमेश बोरकर लिखित, तीन अंकी संगीत ‘बायको चढली डोक्यावर ‘या नाटकाचे यशस्वीरित्या आयोजन कुलथा येथे एकलव्य बाल गणेश मंडळाच्या सौजन्याने २६ फेब्रुवारीला करण्यात आले.
चंद्रकमल थिएटर्सचे’ का रक्त पिता गरिबाचे, व्यथा एका संसाराची, पापी पुत्र ,टाकलेले पोर, बायको पेक्षा मेहुणी बरी या नाटकाप्रमाणेच ‘ बायको चढली डोक्यावर ‘ हे नाटकही हास्यविनोदाने बहरलेले, सामाजिक जाणीवा विकसित करणारे ,भपकेबाज पणाविषयी समाजाची कान उघाडणी करणारे, रंजनातून प्रबोधन करणारे सामाजिक नाटक आहे. कौटुंबिक उदात संस्कृतीचा वारसा लाभलेल्या समूहप्रिय समाजात स्वार्थीपणाने आधुनिकतेच्या नावाखाली होत जाणारे बदल, त्यातून उद्भवणारे पेचप्रसंग , गैरसमज, स्वहितामुळे होणारा
दुरावा,आटत चाललेली आपुलकी व नाते याचे दर्शन नाटकात घडले. कुटुंबातील वृत्ती प्रवृत्ती,झाडीपट्टीतील अव्वल दर्जाचे चंद्रकमल थियटर्स मधील कसदार कलावंतांचा दमदार अभिनय , खुमासदार ,मिश्किल, विनोदाच्या अंगाने जाणारा नाट्याशय ,कुटुंबातील आजूबाजूला घडणाऱ्या घटना- प्रसंगामुळे नाट्य रसिकांनी प्रयोगाचा मनमुराद आनंद लुटला. विशेषतः हट्टी ,अहंकारी, भपकेबाज, उधळपट्टी,चतुर आरतीच्या विसंगत वर्तनामुळे उद्भवलेले वादळे, चंदू व किरणने आरतीला तोंडघशी पाडण्याच्या प्रसंगास प्रेक्षकानी सुखावत प्रचंड दाद दिली.

अनेक महामानव समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे स्त्रियांमध्ये शिक्षणाची सुधारणा झाली. त्या शिक्षित झाल्या. पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी लीलया पदार्पण केलं . हे निश्चितच स्वागतार्ह व प्रेरणादायी बाब . स्त्रिया विविध ठिकाणी नोकऱ्या करू लागल्या आणि त्यांना मिळालेल्या या स्वातंत्र्याचा स्वैर वापराने पतीला आपल्या हातचे बाहूले बनवून संपूर्ण कुटुंबातील इतर सदस्यांना जाचकतेने अन्याय ,अत्याचार करू लागल्या , शिक्षणाच्या डिग्र्या हातात येताच इतरांप्रती तुच्छतेची भावना बाळगणाऱ्या समाजातील अहंकारी प्रवृत्तीच्या महिलाविषयीचे भेदक चित्र या नाटकातून दर्शविले आहे.
कामगारांविषयी प्रचंड आस्था असणारा त्यांच्या भल्यासाठी लढणारा ,कुटुंबावर प्रेम करणारा लहान भावाच्या शिक्षणासाठी धडपडणारा , स्त्रीची महती जाणणारा, कुटुंबातील सर्वांचा सांभाळ करणारा श्याम (विश्वास पुडके), कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारी दिरासाठी गळ्यातील मंगळसूत्र काढून देणारी त्यागी, पतीनिष्ठ कामिनी. (मनीषा देशपांडे), खडतरपणे उच्च शिक्षण घेऊन नोकरीवर लागल्यानंतर शहरातील मुलीशी प्रेम पुढे विवाह करणारा ,पत्नीच्या आदेशावर चालणारा, बिनबुडाचा नवरा, ज्यांच्या त्यागातून आयुष्य फुलले त्या सर्वांना विसरणारा, त्यांच्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतघ्न, बायकोच्या हातातील बाहुला आदित्य (स्वप्निल बन्सोड),
शिक्षणामुळे सुसंस्कृत होण्याऐवजी माणूसघाणी, परंपरांना लाथाडणारी,सौंदर्य अभिमानी, अहंकारी, गर्विष्ठ, हट्टी ,न झुकणारी आझाद पंची ,मुक्त जीवन जगणारी , इतरांना तुच्छ लेखणारी, मुन्नाचे प्रेम लाथाडत धोका देणारी,फटकळ , तुसड्या वृत्तीची ,
खट्याळ (what is this, what do you), लडिवाळ (आदी , आदी), कारस्थानी , खल प्रवृत्तीची आरती ( पौर्णिमा तायडे ) ,सभोवतालचे भान असणारा , मर्यादा जाणणारा , वहिनी विषयी प्रचंड आदर व प्रेम असणारा कुटुंबवत्सल तर प्रसंगी भपकेबाज आरतीची नौटंकी उघडकीस आणणारा , मंजूवर प्रेम करणारा व तिच्या आई-बाबांना सोबत आनंदाने ठेवणारा कुटुंबवत्सल, नाट्यवेडा किरण (लोकेश कुमार), कॉलेज जीवनात पोपट झाल्याने अपमानाचे शल्य उराशी बाळगणारा, सामाजिक बांधिलकी जोपासणारा,श्याम अपघाताने कोसळला असतानाही कोणीही त्याकडे वळत नसतानाही स्वतःहून पुढाकार घेत त्याला सुरक्षित घरी पोहोचविणारा दक्षतावान, कुटुंबीयांशी सलोख्याचे संबंध निष्ठेने जोपासणारा, धोकेबाज आरती घरी दिसताच मुक्याचे नाटक करणारा,संशय वृत्ती बळवताच घर सोडून बाहेर पडणारा आणि कामिनी वहिनींना घरातून हाकलण्याचे माहीत होताच त्वेषाने घरी येऊन आरतीची खरडपट्टी काढणारा,संवेदनशील वृत्तीचा ,एकीकडे प्रेमभंगाचे व अपमानाचे दुःख आयुष्यभर पचवत असला तरी मात्र दुसरीकडे समाजातल्या लोकांसाठी स्वतःहून मदत करणारा सच्चा इंसान, प्रेमळ ,सहकार्यशीलवृत्तीचा मुन्ना उर्फ पंकज (चिदानंद सिडाम), गुन्हेगारी प्रवृत्तीचा, विविध केस लागल्यामुळे गावात लपलेला मनोरंजनाची आवड असणारा ,साधी राहणी शैतानी विचारसरणीवाला, फुकट्या वृत्तीचा, बहिणीच्या सुखासाठी वाटेल ते करणारा, चोर,हल्लेय्या , बाळाला दगडाने ठेचून मारणारा खुनी, कटकारस्थानी, सुखी संसार उध्वस्त करणारा ज्वालामुखी शंभुनाथ (विश्वास पुडके), वडिलांना टीबी झाल्यामुळे त्रस्त असलेली ,कलेच्या भरोशावर जगणारी नृत्यांगना ,किरणवर प्रेम करणारी कलावंत मंजू (ज्ञानेश्वरी प्रभाकर), कॉलेज जीवनामध्ये ऍक्टिव्ह असलेला, रूपावर प्रेम करणारा, आरती सारख्या चंगळवादी मनोवृत्तीचा फुगा चातुर्याने फोडणारा ,कायद्याचे भान असणारा , अंधश्रद्धेला फाटा देणारा वास्तव स्थितीची जाणीव करून देणारा चंदू (प्रा. डॉ. शेखर डोंगरे), मुलीच्या लग्नाची प्रचंड काळजी असणारा, संशयी, फटफटी आणि पेट्रोल घेऊन मागणारा लालची,दिखाऊपणास आसुसलेला, कंजूष, विनोदीवृत्तीचा विशू काका (कॉमेडीकिंग के.आत्माराम), नृत्यात पारंगत असणारी, चंदू वर प्रेम करणारी वडिलांच्या विक्षिप्त स्वभावाने त्रस्त असलेली रूपा (पायल कडुकर) या पात्रांच्या आदान- प्रदानातून, क्रिया -प्रतिक्रियांमधून नाट्यानुभव यशस्वीरित्या साकार झाला.
शहरातील जास्त शिकलेली सून खेड्यातील घरात आल्यामुळे उडालेला गोंधळ ,तिच्यातील शहरीकरणाच्या आगाऊपणाच्या वृत्तीमुळे निर्माण होणारे पेच, ग्रामीण व शहरी संस्कृतीतील तफावतीमुळे उडालेला फज्जा यातून निर्माण होणारे विविध घटना – प्रसंग विनोदी बाजाने नाटकातून उत्तम साकारले आहेत. आरतीचे पती आदित्यला एकेरी नाव घेऊन बोलणे, इंग्रजी बोलणे, किरणचे आरतीच्या शब्दावरील रंजक भाष्य उदाहरणात पंखा बिघडिंग , पाते न हालिंग, आदित्यला किरणने बैलबुद्धा, बायको डोक्यावर चढली म्हणणे यातून निर्माण होणाऱ्या विनोदासही प्रेक्षकांनी प्रचंड दात देत आस्वाद घेतला.
कारखान्यातील कामगारांना गुराढोराप्रमाणे वागवून,अन्याय अत्याचार केला जातो .कामाला पूजा समजणारा ,मजुरांविषयी तळमळ असणारा श्यामला मात्र हे पहावत नाही ,तो मॅनेजरवर हात उगारतो,त्यामुळे नोटीस देऊन त्याला कामावरून काढलं जातं. कामगार क्षेत्रातील विदारकता ही नाटकातून दर्शवली आहे. किंबहुना एका प्राध्यापकाच्या निवृत्ती निमित्त कॉलेजमध्ये प्रिन्सिपलने पार्टीचे आयोजन केलेले असते. या कार्यक्रमात मुलीच्या सांगण्यावरून मुन्ना प्रेम प्रकट करतो पण ती मुलगी प्रिन्सिपलला या मुलावर प्रेम करणं तर सोडाच ओळखत सुद्धा नाही म्हणताच प्रिन्सिपल त्या मुलाला कॉलेजमधून धक्के मारून बाहेर हाकलून लावत रष्टीकेट करतात . एकुलता एक आधार असलेली आई या झटक्याने मरते.आई गेल्याने आधार गेला तुझ्याकडून फक्त मला तुझं प्रेम दे ,आधार दे , अशी याचना विनवणी करतो, पण त्याला ती गुंडांकरवी मारहाण करवते. स्वाभिमानी आदर्श मुन्ना ते शैतान पंकज हा अनोखा प्रवास या प्रसंगातून नाटककाराने दर्शवित प्रेम हा विषय हाताळत डोळस केले आहे.
प्रसंगानुरूप किरणने उच्चारलेले मार्मिक शब्द
लबाड लोम्बडी, मेणाची बाहुली , संसाराचे तीन तेरा वाजविणारी , घेऊन जा गे मारबत,बैलाचा गोठा, भांडे साफ करणे, बाईल बुद्धा ,बाईला, बैल, खुळखुळा, यामुळे वेगळीच रंगत आली.
‘नवलाची बायको कवलाचा घर नवऱ्याले म्हणते स्वयंपाक कर ‘,’बीबी बच्चा कटकट है पर क्या करे साला जवानी हलकट है’, आरती आदित्यला ज्यूस मागते तेव्हा’ माझाच तेल निघाला तर तुला ज्यूस कुठून आणू? या आदित्याच्या संवादाने प्रेक्षागृह खळखळून हसते.
‘ बायको डोक्यावर चढली ‘या नाटकाचा खरा आत्मा तर विनोदच आहे. नाटककाराने अत्यंत मिश्किल विनोदी शैलीत विषय हाताळला आहे. तसेच झाडीपट्टीतील लोकप्रिय विनोदवीर प्रा . डॉ.शेखर डोंगरे , के .आत्माराम व पायल या त्रिकुटांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैलीच्या जुगलबंदीमुळे विनोदाला चार चांद लागले आहेत. कॉलेज गॅदरींगचा प्रसंग ,पाहुण्यांचे आगमन, लावण्य,वतीच्या पायाला जखम होणे नृत्यांगनाची लावणी, प्रमुख पाहुण्यांची 201 रुपये वर्गणी, परिवारासह जेवणाची अभिलाषा, भाषणाचा पोरकटपणा, जेवाचा अना, मटन संपली ,खुर्ची घेऊन पळणे , रितीरिवाज, बाबाजी, वृद्ध ,काकाजी, सेक्रेटरी ,लफडे ,पोस्टमन, मैत्री, कंबर लचक झटके नमस्कार,बाबाजी, कामधंदा, कंबर लचकवलास, यासाठी अंडे खातेस, चेंडू – दाडू, साईजचा बेंडवा, तुरीच्या वावरात, बोंडाची आवड, एक मुलीवर तीन मुले, बापाचा पंचनामा ,दिवस गेल्याचे नाटक , आंबे अशाप्रकारे शाब्दिक कोट्या,शब्दनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदाची निर्मिती करून प्रेक्षकांना लोटपोट हसविले जाते. मुळातच हरहुन्नरी प्रा.शेखर डोंगरे सर व के आत्माराम सर यांना प्रेक्षकांना हसविण्याची नेमकी हातोटी साधलेली याचे प्रत्यंतर याही नाटकातील विनोदी प्रवेशाद्वारे होते.
‘बायको चढली डोक्यावर’ या नाटकातील गीतेही श्रवणीय आहेत. विनोदवीर शेखर डोंगरे यांचे’बघतेस तू माझ्याकड मला आमदार झाल्यासारखे वाटतय,बायको रागाने निघून गेली अजून नाही परत आली सासू पळून गेली, विनोदी गीत,स्वर बहार लोकेश कुमार यांनी गायलेले’ माझ्या वहिनीची माया किती न्यारी माझी वहिनी लाखात प्यारी’, स्वर बहार स्वप्निल बन्सोड’ मे रश्के कमर तुने पहिली नजर ‘चंद्र लाजुनी गेला न्हाळूनी सजनीला रुप देखणे मोहून गेले कसे, कसे कसे हृदयाला, मिलनाला,भिरभिर वारा छेडत असे साजनीला, गोरी गोरी पान तू. जगण्याची श्वास तू , लावणी अशा एकापेक्षा एक श्रवणीय गीतांतून सुमधुर गायनाने प्रेक्षक तल्लीन झाला.

बायको चढली डोक्यावर ‘ हे नाटकच मुळात आरती या मुख्य पात्राशी निगडित आहे. नाटकाच्या सुरुवातीलाच नवविवाहित आदित्य – आरती दांपत्याचा स्वागतासाठी उंबरठ्यावर आरती ओवाळली जाते. त्यावेळेसचा त्रागा व फणकारा करणारी पोर्णिमा तायडे यांचा कायिक ,वाचिक व आहार्य अशा चतुरस्त्र अभिनयाबरोबरच उत्तम संवादफेक, संपूर्ण रंगमंचाचा स्वाभाविक वापर,मुद्राभिनय प्रेक्षकांना घायाळ करून गेली. आरतीचे खलपात्र हुबेहूब अन चपखलपणे पौर्णिमां तायडे हिने विविध छटांसह उत्तम साकारले.
शहरी गुलछडी , फटकडी, लावण्यवती, जादुई , कजाग, भांडखोर , फटकळ आरतीची भूमिका विलक्षण तन्मयतेने अप्रतिम वटविली. आरतीचा मनमानीपणा, राग, संताप, त्वेष,नखरेलपणा,नवऱ्यावरील वचक, तापटपणा ,गोंधळ ,तडफड, जिद्दी, हट्टीपणा, हेकेखोरपणा व अहंकारीवृत्ती असे विविध भावाविष्कार अभिनयसम्राज्ञी पौर्णिमाने अभिनयाच्या जोरावर साकारत नाटकाला उंचीवर नेले.चिदानंद सिडम यांनी मुक्याचा अभिनय वैशिष्ट्यपूर्ण हालचालीने उत्कृष्टपणे पेलवला. मनीषा देशपांडे हिने घरंदाज स्त्री तथा बाळाच्या मृत्यूनंतर वेडी कामिनी सराइतपणे साकारली.तर विश्वास पुरके यांनी भारदस्त आवाज, जबरदस्त पर्सनॅलिटी व बेसयुक्त संवाद फेकीने शंभुनाथ दमदारपणे वठविला. लोकेश कुमार यांनी किरण कौशल्यपूर्ण उपहासात्मक बोलण्याने साकारत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या.. विनोदवीर प्रा.शेखर डोंगरे, के आत्माराम व पायल या त्रिकूटाने तर धम्मालच केली. ज्ञानेश्वरी प्रभाकर हिच्या लावणीने प्रेक्षक अदांकडे पाहतच राहला.इतर कलाकारांनीही आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला

स्वरबहार स्वप्नील बनसोड यांचे श्रवणीय गायन,हिरा मडावी, धम्मदीप ,संघरक्षित रामटेके यांची उत्कृष्ट संगीतसाथ मान डोलवणारी होती. मिलिंद गोंगले, नागसेन मेश्राम, हर्षल सातपैसे यांचे प्रयोग सहकार्य प्रसंगाअनुकूल नेपथ्य मांडणी , दर्जेदार ध्वनीक्षेपण यामुळे उत्तम रसास्वाद घेता आला.
नात्यातील प्रत्ययकारी संघर्ष, खटकेबाज संघर्षपूर्ण संवाद , भावनोद्रेक, मुक्का पंकज व कामिनी संशय, चिट्टीमुळे उडालेल्या गोंधळ,किरण आरतीचा हात पकडणे, झटकेबाज चंदूने रूपाच्या पायातील लचक दुरुस्त करणे, शंभुनाथ मंजूचे डोळे पकडून अत्याचाराचा प्रयत्न करणे, शंभूनाथ रूपाला लग्नाची मागणी घालणं , आरतीने भावाला मागील तेव्हा पैसे देणे , आदित्य आरती (बँकेत कॅशियार) पैशाची अफरातफर,महागड्या वस्तू खरेदी, उधळपट्टी,आरतीने पैसे मागितल्यामुळे आदित्यने बँकेतील रक्कम अपहार करून आरतीला देणे ,पैशाची अफरातफर झाल्यामुळे दोघांनाही नोकरीहून काढणे, दादा बँक, चेक बुक, हुशार चंदूने वहिनीचा पगार गेला कुठे ?असा प्रश्न उपस्थित करणे. गरोदरपणाचे नाटक करून विशू काकाकडून शंभुनाथ चे कारस्थान उघड करणे , संशयास्पद चिठ्ठी व रक्ताळलेला दगड यामागचे रहस्य शोधणे , पंकज आरतीतील संघर्ष ,पंकजने विष प्राशन करणे, शेवटी आरतीवर हल्ला करणे, या सर्व प्रसंगातून नाटककाराने वेगवेगळे विषय चपखलपणे हाताळले आहेत . तद्वतच कल्पक दिग्दर्शक प्रा.डॉ.शेखर डोंगरे यांनी विविध वृत्ती प्रवृत्तीचे दर्शन प्रेक्षकांना कौशल्यपूर्णरित्या घडविले आहे. कलावंतांच्या कसदार अभिनयामुळे विविध विषय प्रेक्षकांच्या थेट मनाशी भिडले.कामगारांचा प्रश्न नातेसंबंध , चंगळवादी मनोवृत्तीचे दर्शनाबरोबरच कौटुंबिक नाटकास विनोदाच्या दिलेल्या फोडणीमुळे अव्वल दर्जाचे नाटक पाहणारा प्रेक्षक सलग सहा तास खुर्चीला खिळून मनमुराद आस्वाद घेत राहिला.

प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here