लोकदर्शन गडचांदूर 👉अशोककुमार भगत
गडचांदूर दिनांक 25फेब्रुवारी – शहरातील जुन्या पद्धतीच्या मिरची पिसाई चक्कीमुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करत मुख्याधिकारी यांना अनोख्या पद्धतीने निवेदन दिले. या निवेदनासोबत मिरची सुपूर्त करत त्यांनी अथवा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ती पिसून पाहावी, म्हणजे होणारा त्रास प्रत्यक्ष कळेल, अशी मागणी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते दीपक वरभे यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, गडचांदूर शहरात एकूण १२ मिरची पिसाई केंद्रे आहेत. त्यापैकी ११ केंद्रे आधुनिक मशिनरीने सुसज्ज आहेत. मात्र, एकमेव जुनी पद्धतीची वॉर्ड नं २ मध्ये असलेली मिरची चक्की सुरू असल्याने शेजारी नागरिकांना सातत्याने डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास आणि असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत न. प. ला वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्याने नागरिकांनी थेट अनोख्या अंदाजात निषेध नोंदवला.
या निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी यांनी तात्काळ त्या चक्की चालकास नोटीस पाठवली आहे. यावर काय निर्णय घेतला जातो आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, याकडे आता संपूर्ण वॉर्ड वाशीयांचे लक्ष लागले आहे.