By : Avinash Poinkar
चंद्रपूर :
सध्या सामाजिक संवेदना सोडून केवळ कुटुंबापुरते जगण्याचाच लोक विचार करतात. सामाजिक दायित्वाची भावना मनात ठेवून कवी बी.सी.नगराळे यांनी साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले. माणूस किती जगला, यापेक्षा कसा जगला याला जास्त महत्त्व आहे असे प्रतिपादन हॅपी थॉट्सचे विदर्भ समन्वयक सुधाकर ढवस यांनी केले. फिनिक्स साहित्य मंच तर्फे श्रमिक पत्रकार भवनात नुकतेच बी.सी नगराळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा व कवी संमेलन पार पडले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी श्रीपाद जोशी, स्तंभलेखक आशिष देव उपस्थित होते.
कार्यक्रमात बी.सी.नगराळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. नगराळे यांनी स्वतःच्या संघर्षातून नंदनवन फुलवून मुलांवर संस्कार केले. ग्रंथप्रेम व महामानवांच्या मार्गावर चालणारा पांथस्थ या शब्दात श्रीपाद जोशी यांनी गौरव केला. फिनिक्सची स्थापना करून साहित्य वर्तुळाबाहेरील धडपड्या नवोदित साहित्यिकांना नगराळे यांच्या पुढाकारात हक्काचे स्थान मिळाल्याचे मत आशिष देव यांनी मांडले. लोकशाही मार्गाने फिनिक्स साहित्य मंच चालत असून त्याला सामाजिक उपक्रमाची जोड देत नगराळे यांनी दिशादर्शक काम केल्याचे मत अध्यक्षस्थानाहून जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी व्यक्त केले.
दुसऱ्या सत्रात कवी अरुण घोरपडे लिखित ‘मानसातला मानुसपना’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कवी जयवंत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली व कवी शेष देऊरमले त्यांच्या प्रमुख उपस्थितीत निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले. यात महेश कोलावार, नागसेन सहारे, सुभाष उसेवार, एम.ए.रहीम, रमेश भोयर, सुधाकर कन्नाके, अनिल पिट्टलवार, नटराज गेडाम, बाळू वाघमारे, जयराम मोरे आदी कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिनिक्सचे अध्यक्ष नरेशकुमार बोरीकर, संचालन विजय वाटेकर व धर्मेंद्र कन्नाके तसेच आभार सुरेंद्र इंगळे, गोपाल शिरपूरकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने साहित्य रसिकांची उपस्थिती होती.
