By : Devanand Sakharkar
सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी सोहळा
चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. जेथे आर्थिक संस्था उभ्या राहतात, तेथे विकास भरभरून होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग क्षेत्रासोबत जोडले आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते आहे. त्यामुळे एक डीजीटल ओळख निर्माण झाली आहे. त्याचा फायदा थेट नागरिकांना मिळत असून देशाच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा असतो, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, कीर्तिकुमार भांगडीया, करण देवतळे, देवराव भोंगळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री व बँकेच्या संचालिका शोभाताई फडणवीस, अध्यक्षा डॉ. रजनी हजारे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.
सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेने 25 वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रात विदर्भातील एक अग्रगण्य बँक म्हणून सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेची ओळख आहे. महिलांना अर्थकारण उत्कृष्टपणे समजते. बचत करणे हा महिलांचा मूळ गुणधर्म आहे. त्यामुळे महिलांच्या हाती बँक असेल तर ती उत्कृष्टच चालेल, यात शंका नाही. रिझर्व बँकेच्या कायद्याचे पालन करीत तसेच एनपीए मानकाला छेद न देता बँक चालविणे अतिशय महत्त्वाचे आहे.
सहकारी बँकेवर नागरिकांचा विश्वास असतो. या बँकेबद्दल सामान्य माणसाला आपुलकी असते. बँकेने सुद्धा दिलेले कर्ज शिस्तीमध्ये परत घेतले पाहिजे. आज 300 कोटींची उलाढाल असलेल्या सन्मित्र बँकेचा एनपीए 0.5 टक्क्यांच्या खाली आहे, ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी असून यासाठी सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.
पुढे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांनी अतिशय चांगली प्रगती केली आहे. व्यावसायिक बँकांसमोर सहकारी बँकेने आव्हान उभे केले आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सहकारी बँका टिकतील का, असा प्रश्न उपस्थित होत असताना सन्मित्र सारख्या बँकांनी हे आव्हान चांगल्या पद्धतीने स्वीकारून यशस्वीपणे वाटचाल केली आहे. आज या बँकेने कोर बँकिंग, डिजिटल बँकिंग पद्धती स्वीकारली आहे. सन्मित्र बँकेने ग्राहकांच्या सुरक्षेचे विषय हाती घेतले आहेत. बँकांकडून नागरिकांना कर्ज दिली जातात. त्यामुळे नागरिक स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करीत आहे. सन्मित्र बँकेने सुद्धा नागरिकांना कर्ज उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून त्यांनी रोजगार उभा केला. त्यामुळे अर्थव्यवस्थेची चक्र चालण्यास मदत झाली. या बँकेने पुढील वाटचाल अधिक जोमाने करावी.
संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून जाहीर केले आहे. याच वर्षी सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सव होत आहे, ही आनंदाची बाब आहे. भविष्यात आणखी दमदार पाऊल टाकून 500 कोटी, 750 कोटी आणि 1000 कोटीचा टप्पा बँकेने पार करावा. तसेच इतर सहकारी बँकांसाठी सन्मित्र बँक एक रोल मॉडेल म्हणून उभी राहावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा विस्तार सहा-सात जिल्ह्यात झाला असून महिलांना आर्थिक सक्षम करणे, हेच या बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बँकेला नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रास्ताविकात संचालिका शोभाताई फडणवीस म्हणाल्या, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले, याचा मनापासून आनंद आहे. बँकेची वाटचाल यशस्वीपणे होत असून पुढे जाण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. आज सन्मित्र बँकेच्या सर्व शाखांमध्ये एटीएम, डीजीटल बँकींग आदी सोयीसुविधा आहेत. विशेष म्हणजे आमच्या बँकेचा एनपीए कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बँकेच्या अध्यक्षा डॉ. रजनी हजारे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.
तत्पुर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लक्षलक्षिता’ या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर मा.सां. कन्नमवार यांचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कीर्ति चांदे यांनी तर आभार माधवी तांबेकर यांनी मानले.
![](https://www.lokdarshan.co.in/wp-content/uploads/2024/09/IMG-20240918-WA0029.jpg)