लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर: दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीचे (DRUCC) सदस्य आशिष देरकर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना पत्र पाठवून दोन महत्त्वाच्या रेल्वे सेवांबाबत मागणी केली आहे. या पत्राद्वारे त्यांनी भाग्यनगर एक्सप्रेस (17234) नियमित करण्यासह वर्धा-बल्लारशाह पॅसेंजर (61127) चा कागजनगरपर्यंत विस्तार करण्याची विनंती केली आहे.
भाग्यनगर एक्सप्रेस नियमित करण्याची मागणी
सध्या भाग्यनगर एक्सप्रेस ही केवळ कागजनगरपर्यंत चालवली जाते. कोरोना महामारीच्या अगोदर ती बल्लारशापर्यंत चालवली जात होती. आता पुन्हा पूर्वीप्रमाणे ती बल्लारशापर्यंत चालवली जावी अशी मागणी आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणामधील प्रवाशांसाठी ही रेल्वे नियमित सुरू करणे आवश्यक असल्याचे आशिष देरकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. विद्यार्थी, व्यापारी आणि वैद्यकीय गरजांसाठी हैदराबाद येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही गाडी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
वर्धा-बल्लारशाह पॅसेंजरचा कागजनगरपर्यंत विस्तार
सध्या वर्धा-बल्लारशाह पॅसेंजर (61127) ही सकाळी ११:३० वाजता बल्लारशाहला पोहोचते आणि संध्याकाळी १८:३० वाजता परतीला जाते. ही गाडी जर कागजनगरपर्यंत विस्तारित केली गेली, तर स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. बल्लारशाह ते कागजनगर हे अंतर केवळ ८० किलोमीटर असून, यामुळे महाराष्ट्र-तेलंगणा प्रवाशांना मोठा फायदा होईल.
यासंदर्भात आशिष देरकर यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना पाठवलेल्या पत्रात या दोन्ही रेल्वे सेवांचा विस्तार झाल्यास प्रवाशांना अधिक सोयीस्कर सुविधा मिळेल, असे स्पष्ट केले आहे. तसेच, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. रेल्वे प्रवाशांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
