लोकदर्शन गडचांदूर :👉अशोककुमार भगत
रमाई जयंती निमित्त कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे नुकताच गाडगे बाबांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. प्रा. माधुरी पेटकर यांनी अत्यंत प्रभावीपणे हा प्रयोग सादर करत समाज स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रयोगात त्यांनी गाडगे बाबांचे वेशभूषा, त्यांची वाणी आणि समाजप्रबोधनाची तळमळ जिवंत केली. प्रयोगादरम्यान “स्वच्छता हीच खरी सेवा” हा संदेश त्यांनी दिला. गाडगे बाबा कशा प्रकारे गावोगाव जाऊन समाजप्रबोधन करीत असत, त्यांनी स्वच्छतेसाठी दिलेला संदेश आणि त्यांचा साध्या जीवनशैलीचा आदर्श यांचे उत्कृष्ट सादरीकरण प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमादरम्यान प्रा. पेटकर यांनी प्रत्यक्ष झाडू हाती घेत परिसर स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांनी उपस्थितांना “आपले गाव, आपली जबाबदारी” या भावनेतून स्वच्छतेची सवय लावण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि गडचांदूर परिसरात सामाजिक जबाबदारीची नवीन प्रेरणा निर्माण झाली. यावेळी प्रा. डॉ. माया मसराम यांनी रमाई गीतावर उत्कृष्ठ नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकलीत.
या कार्यक्रमास स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडचांदूरवासीयांनी या प्रयोगाचे कौतुक केले व स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेण्याचे आश्वासन दिले.
