विदर्भ महाविद्यालय, जिवती येथे तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचा शुभारंभ*


लोकदर्शन जिवती 👉प्रा. गजानन राऊत

जिवती: विदर्भ महाविद्यालयात दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देऊन, त्यांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक असा चौफेर विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमक्ष ठेऊन सदर महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास विभागाकडून या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

म. गांधी महाविद्यालय, गडचांदुर चे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी ‘भावनिक स्थैर्य आणि सुदृढ मानसिकता’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिव्यक्त होताना “भावनिक स्थैर्य आणि सुदृढ मानसिकता म्हणजे संकटांमध्ये निरामय शांत राहण्याची क्षमता, सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे कसब आणि मनोबलाच्या स्वबळावर जीवनातील चढ-उतार समर्थपणे हाताळण्याची ताकद होय” असे प्रतिपादन करीत विस्तृत प्रकाश टाकला तर या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचे व्याख्याते डॉ. मनोहर बांद्रे ‘ भाषण कला आणि वक्तृत्व विकास ‘ या विषयावर आपले मनोगत मांडताना “भाषण कला आणि वक्तृत्व विकास म्हणजे प्रभावी संवाद कौशल्याच्या माध्यमातून विचार स्पष्टपणे मांडण्याची क्षमता, श्रोत्यांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याची कला आणि आत्मविश्वासाने व प्रभावीपणे व्यक्त होण्याची हातोटी.” असे म्हटले.

या प्रसंगी सदर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात, या तीन दिवसीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधला जावा या उद्देशाने, नानाविध क्षेत्रातील नामवंत आणि व्यासंगी व्यक्तींना आमंत्रित करून विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून दिल्या जाईल, असे दांडगे आश्वासन दिले. या शिबिराच्या प्रथम दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून श्री व्यंकटेश बहुद्देशीय संस्था चे सभासद श्री. विश्वनाथ देशमुख, प्रा. डॉ. गजानन राऊत आणि IQAC समन्वयक प्रा. संजय कुमार देशमुख यांची विशेष मार्गदर्शन आणि उपस्थिती लाभली.

या तीन दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन, नियोजन आणि संयोजन करण्यात प्रा. सचिन शिंदे यांनी अग्रक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गणेश कदम यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. दिनेश दुर्योधन यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सोबतच या शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळून नवी दिशा मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here