मराठी भाषेवर प्रभुत्व आणि कौशल्ये आत्मसात करा : प्रसिद्ध कवी, भाषा अभ्यासक व संशोधक अविनाश पोईनकर

By : Shankar Tadas
गडचिरोली :

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात मराठी बोलणारे १४ कोटी लोक असून राज्यात २५० कोटींच्यावर मराठी पुस्तकांच्या विक्रीची उलाढाल होते. मराठी भाषेत अनुवादाची मोठी परंपरा असून अनुवाद प्रक्रियेचे जागतिकीकरण झाले आहे. अनुवाद क्षेत्र, पत्रकारिता, नियतकालिके, डीजीटल माध्यमे, मुद्रित शोधन, दूरदर्शन, आकाशवाणी, चित्रपट क्षेत्र, जाहिरात माध्यमे, निवेदन, कथन, सूत्रसंचालन, वक्तृत्त्व, लेखन तसेच जागतिक स्तरावरील मायक्रोसॉफ्ट कंपण्याही मराठीत आपले साॅफ्टवेअर करत आहेत, अशा अनेक ठिकाणी मराठी जाणकारांची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेत प्रभुत्त्व संपादन करुन कौशल्ये आत्मसात केल्यास यातून रोजगार निर्मिती करता येईल, असे मत सुप्रसिद्ध कवी, भाषा अभ्यासक व संशोधक अविनाश पोईनकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, भाषा संचलनालय आणि पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या समारोपीय कार्यक्रमात मराठी भाषा : रोजगाराच्या संधी या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव विज्ञान विद्याशाखाचे अधिष्ठाता डॉ.श्याम खंडारे तर प्रमुख अतिथी म्हणून भाषा संचालनालय मुंबईचे अनुवादक जनार्दन पाटील, पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाच्या डॉ.सविता गोविंदवार, प्रा.अमोल चव्हाण, डॉ.हेमराज निखाडे, डॉ.निळकंठ नरवाडे उपस्थित होते.

मराठी भाषेची श्रीमंती सातासमुद्रापलीकडे पोहोचलेली असून तिला पराजयाची किंवा मरणाची भीती नाही. ती अजरामर असून म्हाईंभट, ज्ञानेश्वर, तुकाराम, मुकुंदराजांनी साहित्यरुपात ठेवलेल्या मराठीच्या अस्सल ठेव्याकडे आपण डोळसपणे पाहिले पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अनेक फायदे होणार आहेत, त्याचा आपल्याला उपयोग करता यायला हवा. मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी मराठी भाषिकांनी मराठीतूनच संवाद करावा. मराठी भाषेच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्या शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले मार्ग आपणच शोधले पाहिजे.मराठी भाषेच्या जाणकारांसाठी हा सुवर्णकाळ असून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या माध्यमातून लक्षवेधी काम करावे, त्यासाठी कौशल्य आत्मसात करावे म्हणजे यश प्राप्तीपासून कुणीही रोखू शकणार नाही असे मत देखील अविनाश पोईनकर यांनी व्यक्त केले.

जनार्दन पाटील यांनी मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय यांच्या कार्याविषयी व मराठी भाषेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कामाच्या संधीविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रमुख डॉ.सविता गोविंदवार यांनी मराठी भाषेच्या ज्ञानाने मला काय मिळवून दिले आणि हे ज्ञान विद्यार्थ्यांच्या कमाईचे साधन कसे ठरू शकते? यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी माडिया भाषेत अनुवाद केलेली संविधानाची उद्देशिका अविनाश पोईनकर यांनी मराठी विभागाला भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.हेमराज निखाडे यांनी केले. संचालन तुषार दुधबावरे, देवयानी नवघरे तर आभार विशाल भांडेकर यांनी मानले. यावेळी डॉ.प्रशांत सोनावणे, डॉ.नरेंद्र आरेकर, डॉ.राम वासेकर, प्रा.संदीप कागे, डॉ.प्रीती पाटील, प्रा.रोहित कांबळे, रविंद्र चुनारकर, सतिश कुसराम सायली मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here