By: राजेंद्र मर्दाने
वरोरा : येथील उपजिल्हा रुग्णालय कार्यालयाच्या दालनात मराठीचे आद्यसंपादक ‘ दर्पणकार ‘ बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘दर्पण दिन’ अर्थात ‘ पत्रकार दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल खुजे, जय हिंद सैनिक संस्था तथा पत्रकार सुरक्षा समितीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने, उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी गेडाम, सहायक अधिसेविका वंदना बरडे इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला डॉ. प्रफुल खुजे, राजेंद्र मर्दाने, डॉ.अश्विनी गेडाम, वंदना बरडे या प्रमुख मान्यवरांसह अन्य अधिकारी – कर्मचाऱ्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.
डॉ. खुजे म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जातीयवाद, अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह आणि स्त्रियांवरील अन्याय यासारख्या विषयांवर विपुल लेखन व जनजागृती केली त्यामुळे त्यांना आद्य समाजसुधारकही म्हंटले जाते.
राजेंद्र मर्दाने म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकार नव्हे तर बहुभाषाविद होते. ‘ दर्पण ‘ चा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रसिद्ध झाला. दर्पण हे वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी अशा जोडभाषांमध्ये प्रकाशित होत असे. मराठी लोकांना देशात चाललेल्या घडामोडी समजाव्या आणि इंग्रजांना वृत्तपत्रातील आशय कळावा, यासाठी असे दुहेरी स्वरूप या वृत्तपत्राचे होते. दर्पण हे समाज जागृतीचे व्यासपीठ होते. त्यांच्या योगदानाचा आदर करण्यासाठी हा दिवस प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरा करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.
कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक ओंकार मडावी, सुरेखा बगमारे, परिसेविका संगीता नकले, कक्षसेवक सुमित ठेंगणे, बंडू पेटकर, अमोल भोंग, नीता वाघमारे आदी उपस्थित होते.