लोकदर्शन गडचांदूर 👉 अशोककुमार भगत
गडचांदूर-दि०३/०१/२०२५ह्या महाराष्ट्राच्या मातीला शिव,फुले,शाहू,आंबेडकर यासारख्या महापुरुषांचा खूप मोठा वारसा लाभलेला आहे. या महापुरुषांचे विचारच राष्ट्राला व या देशाला वाचवू शकतात. विद्यार्थ्यांनी या देशाप्रती असणारी आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे .महापुरुषांनी केलेला संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे.महापुरुषांपासून प्रेरणा घेऊन आपले जीवन आपल्याला घडविता आले पाहिजे.भाषेमुळे माणसे दुरावतात भाषा ही प्रेमाची असली पाहिजे, भाषा ही करुणेची असली पाहिजे. आपल्याला ना नास्तिक व्हायचे आहे ना आस्तिक व्हायचे आहे.आम्हाला वास्तविक व्हावे लागेल.सध्या देशांमध्ये प्रचंड द्वेषाचे वातावरण आहे.त्यामुळे आम्हाला आमची जबाबदारी समजून घ्यावी लागेल. सर्व धर्माचा आदर करत भारतीय संविधानाची मूल्य विद्यार्थ्यांनी आपल्या मनात रुजवावी.माणसातला माणूस आपल्याला शोधता आला पाहिजे आणि ते समजून घेण्यासाठीच आपल्याला महापुरुष वाचावे लागेल असे विचार प्रसिद्ध युवा वक्ता,साहित्यिक,विचारवंत अॅड. सचिन मेकाले यांनी सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन व समाज प्रबोधन कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मांडले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.आनंदरावजी आडबाले उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून ज्योतिबा सावित्रीबाईंनी केलेल्या त्यागामुळेच आज या देशातील महिला सन्मानाचे जीवन जगत आहे.विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन घडविले पाहिजे. कठीण परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य या महापुरुषांच्या विचारात आहे असे प्रतिपादन केले .कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे,कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे,व्यवसाय विभाग प्रमुख प्रा. विजय मुप्पीडवार,संजय सुर्यवंशी,प्रा. शिल्पा कोल्हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत खैरे यांनी केले .सूत्रसंचालन प्रा.कुमारी सोज्वल ताकसांडे यांनी केले. तर आभार प्रा. कुमारी जयश्री ताजने यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अशोक सातारकर,प्रा.जहीर सय्यद,प्रा.दिनकर झाडे, प्रा अनिल मेहरकुरे,प्रा.प्रवीण डफाडे,करण लोणारे ,स्नेहल चांदेकर,सिताराम पिंपळशेंडे आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.