By : Shankar Tadas
राजुरा येथील ओम साईराम मंगल कार्यालयात 29 डिसेंबर रोजी विठोबा कवलकार यांचा विवाह होता. त्यात गर्दीचा फायदा घेत मोबाईलचोराने एका महिलेचा मोबाईल चोरला. तो मोबाईल एका महिला पोलिसाच्या आईचा होता. बरीच शोधाशोध केल्यानंतर चोरटा सापडला. त्यामुळे तेथील पाहुण्यानी त्याला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.
ठाणे येथील महिला पोलीस शीतल जावीर राजुरा येथील विवाह समारंभासाठी आईसह हजर होती. दरम्यान आई सुलोचना शेंडे यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले.बरीच शोधाशोध केल्यानंतर अखेर CCTV फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी एक चोरटा जेवण्याच्या लाईनमध्ये प्लेट घेऊन उभा होता. त्याने लाईनमधील सुलोचना शेंडे यांच्या पर्समधून मोबाईल काढला व रिकामी प्लेट घेऊन बाजूला गेल्याचे दिसून आले. नंतर तो हॉलबाहेर गेला नाही. पोलिसांना सदर माहिती देऊन बोलावण्यात आले. पोलिसांनी खडसावून विचारले असता मोबाईल चोरीची कबुली दिली. मात्र मोबाईलचे सिम फेकून दिले होते. त्यानंतर घटनेची तक्रार देण्यासाठी महिला पोलीस शीतल जावीर या गेल्या व तक्रार नोंद करण्यास सांगितले. सोबत इतरही पाहुणे होते. तेव्हा ठीक आहे असे पोलिसांनी सांगितले. मात्र त्या ठाणे येथील असल्यामुळे तपासाकरिता येणे होणार नसल्याचे सांगून तक्रार नोंद केली नसल्याचे कळले. त्यानंतर राजुरा येथील त्यांची बहीण आणि जावई यांना रात्री पाठविले असता तुमच्या आईला घेऊन या, असे सांगून परत पाठविले. एकूणच आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांनी केलेला प्रयत्न प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. पोलिसांच्या हाती सबळ पुरावे आणि आरोपी असताना त्याला मोकळे सोडणे म्हणजे गुन्हेगारीस चालना देणेच नव्हे काय असा प्रश्नही यानिमित्त निर्माण होत आहे. पोलीस विभाग लोकांच्या बाजूने आहे की चोरांच्या, अशी शंका यावी इतपत वाईट अनुभव सदर प्रकरणात राजुरा पोलिसांनी दिला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा आरोपीवर नोंद झाला नव्हता तसेच आरोपीचे नावही उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला.