By : Shankar Tadas
कोरपना :
कोरपना तालुक्यात ८० चा दशकात अल्ट्राटेक सिमेंट (एल अँड टी) उद्योगाने पाय रोवले. स्थानिक शेतकऱ्यांनी कसलाही विरोध न करता आपल्या क्षेत्रातील बेरोजगार तरुणांचा हाती रोजगार येणार आणि तो पिढ्यान् पिढ्या कायम राहणार या उद्देशाने आपली शेती अल्प दरात कंपनीचा घशात घातली. परंतु आज घडीला परिस्थिती वेगळी असून ज्या शेतकऱ्यांची मुलं या कंपनीत लागले होते ते आता कामावरून निवृत्त झाले. त्यांच्या मुलांना कामावर कंपनी प्रशासन घायला तयार नाही तर ज्यांना घेतले आहे त्यांना बरोबर रोजी द्यायला तयार नाही. त्यामुळे मागील अनेक दिवसा पासून कंपनी प्रशासनकडून कामगाराना वेठीस धरून पिळवणूक होत आहे. काम करा अन्यथा घरी बसा, ही पॉलिसी कंपनी प्रशासनकडून वापरल्या जात आहे. हा प्रश्न आमदार देवरावदादा भोंगळे यांनी विधानसभेत लावून धरला.
अल्ट्राटेक कंपनीत अनेकांनी कामगारांमध्ये फाटा फूट करून आपल्या हिताकरिता विविध कामगार संघटना उभा केल्या. परंतु पाहिजे त्या प्रमाणावर अजूनही यश आले नसून परिस्थिती जैसे ते आहे. याकडे मुत्सद्दी कामगार संघटना वेळोवेळी आपले धोरण बदलून विविध पक्षांना पाठिंबा देऊन कामगारांची हेळसांड करत आहे. यापूर्वी कंपनीच्या गेट समोर 264 लोडर कामगार घेऊन आंदोलन देखील केले होते. तरीही कठोर प्रशासन जुमानत नसून कामगाराचे रोजंदारी प्रश्न कायम आहे. यामुळे आमदार होताच देवराव भोंगळे यांनी थेट कामगार पिळवणूकीचा मुद्दा विधान सभेत मांडून सर्वाचे लक्ष वेधले.
30 वर्षापासून सिमेंट उद्योग सुरू असून या उद्योगातून निघणारा धूर मोठ्या प्रमाणावर सोडला जातो. त्यामुळे येथील परिसर प्रदूषित झाला आहे. याचा परिणाम शेतीवर होत असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. उत्पादनात घट झाली आहे. प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम सुद्धा होत आहे. त्वचेचे रोग, श्वसन नलिका, हृदयाचे आजार अधिक प्रमाणावर दिसून येत आहे. यावर अजूनही कंपनी प्रशासनाने कोणत्याही ठोस उपाययोजना राबवीत नसून थातूरमातूर कृषी व आरोग्यावर आधारित कार्यक्रम घेऊन काही मोजक्या लोकांना खूष करण्याचे काम सुरू आहे. हा मुद्दा सुध्दा विधानसभेत गाजला असून योग्य व रास्त मुद्दा मांडल्याने परिसरातील कामगार व शेतकऱ्यांमध्ये आमदार देवराव भोंगळे कर्तव्य दक्ष असल्याची भावना व्यक्त केली जात आहे
कंपनी प्रशासनाकडून कामगारांची होत असलेल्या दडपशाहीविरोधातील ज्वलंत प्रश्नाला थेट विधानसभेत वाचा फोडली असून येत्या काळात आमदार साहेब कामगार व शेतकरी यांच्या हिताचा दृष्टीने नक्कीच पुढाकार घेऊन या भागातील शेती व बेरोजगारीचा प्रश्न सोडवतील असा विश्वास कोरपना तालुका भाजपा अध्यक्ष संजय मुसळे यांनी व्यक्त केला.