By : Shankar
राजुरा :
औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर व कोरपना या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही बसस्थानक नसल्याने येथील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघातील गडचांदूर व कोरपना या दोन शहरांची लोकसंख्या सुमारे पस्तीस हजाराच्या आसपास असून अद्याप बसस्थानक नसल्यामुळे या भागातील नागरिकांना प्रवास करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडीअडचणी निर्माण होत आहेत. येथील नागरिकांची अडचण लक्षात घेता आमदार देवराव भोंगळे यांनी गडचांदुर व कोरपना येथे नवीन बसस्थानक निर्माण करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
गडचांदुर व कोरपना दोन्ही शहर ९३० डी या राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख शहरे असून याठिकाणी बसस्थानक होणे अत्यंत गरजेचे होते, परंतु अद्यापपर्यंतही या दोन्ही ठिकाणी नवीन बस स्थानक करण्याबाबत कार्यवाहीमध्ये दिरंगाई होत आहे. ही बाब आमदार देवराव भोंगळे यांच्या निदर्शनास आली. गडचांदूर येथील नवीन बसस्थानक करणेबाबत जिल्हा प्रशासनाने रीतसर प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला असून कोरपनाच्या बसस्थाकाकरीता अद्याप भु-संपादन होणे बाकी आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हा-पावसासह धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या दोन्ही ठिकाणी नागरिकांना प्रवास करण्यामध्ये सोयीचे होईल या उद्देशाने तातडीने नवीन बसस्थानकास भूसंपादनासह मंजुरी देण्यात यावी. अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री यांनी परिवहन विभाग यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.