लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना: तालुक्यातील आवाळपुर येथील पं. जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या १९९९-२००० सत्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत स्नेहमिलन सोहळा आयोजित केला. रविवारी हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात तेव्हा शिकवणारे मुख्याध्यापक आणि शिक्षकही उपस्थित होते. या सोहळ्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि विद्यार्थी-शिक्षकांमध्ये आनंददायी क्षण निर्माण झाले.
स्नेहमिलन सोहळा विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. सकाळपासूनच माजी विद्यार्थी एकत्र जमू लागले. शालेय जीवनातील आठवणींनी भारावलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या मित्रांशी गप्पा मारल्या आणि हसतखेळत जुनी ओळख ताजी केली. मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या यशाच्या कथा ऐकल्या.
शिक्षकांचा सत्कार आणि जुन्या आठवणींना उजाळा
या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष से. नि. मुख्याध्यापक जनार्दन डाहुले, से. नि. मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे उद्घाटक पुंडलिक उराडे, प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान मुख्याध्यापक देवानंद धाबेकर, हरिश्चंद्र थिपे, बाबाभीम उमरे, सुरेश हुलके, सुरेखा उराडे, बाबा वाभीटकर, दीपक धोपटे, नथुराम हुलके, सुरेश दुधगवळी, शामराव वासाडे, प्रभाकर बोभाटे, बाळा गोहोकार, शशिकांत धनवलकर उपस्थित होते. यावेळी शिकवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील आठवणी शेअर करताना जुने किस्से आणि मजेदार घटनांचा उलगडा केला. काहींनी शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल सर्वांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन अशोक पानसे यांनी केले. प्रास्ताविक आशिष देरकर यांनी केले तर आभार रोहित कडूकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.
स्नेहमिलनाचा मुख्य उद्देश म्हणजे जुन्या मित्रांना भेटणे, त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेणे आणि शाळेसोबत पुन्हा एक नाते जोडणे हा होता. याशिवाय विद्यालयाला मदत करण्यासाठी काही उपक्रम राबवण्याचाही आमचा मानस आहे.
– शंकर क्षीरसागर, माजी विद्यार्थी