By : Shankar Tadas
गडचांदूर :
विकासाचा नारा देत देवराव भोंगळे यांनी निवडणूक लढवली आणि आमदार झाले. निवडणुकी दरम्यान प्रत्येक सभेत विकासात्मक दृष्टीने पाऊल टाकण्याचे आणि जनतेच्या समस्याचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. याचीच प्रचिती आमदार झाल्यावर दिसून येत असून निमनी येथील विद्यार्थी गडचांदूर येथे बस करिता ताटकळत असल्याचे एका युवकाने फोन करून सांगितले. आमदाराने फोन लावताच लगेच दहा मिनिटात बस आली. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा तर मिळाला थंडीचा दिवसात लवकर घरी पोचल्याने पालक सुद्धा आनंदी झाले.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील निमनी येथील अंदाजे ३० मुले शिक्षणा करिता गडचांदूर येथे जातात. परंतु विद्यालय सुटले की ते बस अभावी नेहमीच गडचांदूर बस स्थानकावर ताटकळत राहतात. ही बाब नित्याचीच. त्यामुळे त्यांना नाहक त्रासही सहन करावा लागतो. आज देखील तीच अवस्था मुलांची झाली होती. एकीकडे थंडीचा पारा चढला असताना दुसरीकडे घरी जाण्याची ओढ या परिस्थितीत त्यांना फक्त बस येण्याची आस लागली होती. परंतु बस काही येईना. शेवटी गावातीलच एक युवक बस स्थानकाकडे गेला असता त्याला विद्यार्थी उभे दिसले. त्याने थेट आमदारांनाच फोन लावून सांगितले. त्यानी देखील विलंब न करता अवघ्या दहा मिनिटात बस उपलब्ध करून दिली आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर आमदाराने बस पाठविली याचा आनंद देखील जाणवत होता.
महिना व्हायच्या आत आमदारांनी कामाचा सपाटा लावला असून नेहमीच फोन वर उपलब्ध असल्याने ते समस्याचे लगेचच निवारण करीत असल्याची प्रचिती या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष व नेहमी उपलब्ध असलेले आमदार आपल्याला मिळाल्याची जनमाणसात चर्चा आताच सुरू झाली आहे.
मी बस स्थानकावर गेलो असता तिथे गावातील विद्यार्थी दिसून आले. विचारणा केली असता बस अभावी ते तिथेच उभे असल्याचे सांगितले. लगेच आमदारांना फोन करून कळविले तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून दिली, अशी प्रतिक्रिया सचिन पिदूरकर निमणी यांनी दिली.