By : Shankar Tadas
राजुरा :
अगदीच अटीतटीचा तिरंगी सामना राजुरा विधानसभा क्षेत्रात रंगला. प्रत्येक फेरीला उत्कंठावर्धक निकाल येत असल्यामुळे तीनही उमेदवारांचे समर्थक ‘गुलाल आपलाच’ मानत होते. मात्र शेवटी सतराशे मतांनी भाजपाचे देवरावदादा भोंगळे विजयी होत असताना काँग्रेसच्या वतीने आक्षेप घेत पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली. फेरमोजणीतही दादाच पुढे असल्यामुळे दोन बुजुर्ग नेत्यांना अखेर पराभव स्वीकारावा लागला.
बुजुर्ग विरुद्ध नवखे असा सामना राजुरा विधानसभा क्षेत्रात पहायला मिळाला. मागील निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवून दिल्याने यावेळीही गोंडवाना गणतंत्र पार्टीने आपली ताकद पणास लावली. मनसेचे सचिन भोयर, संभाजी ब्रिगेडचे भूषण फुसे यांची एन्ट्री लक्षवेधक ठरली. प्रचारात ऍड. वामनराव चटप यांची हवा असल्याचे बोलले गेले. काँग्रेसचे सुभाष धोटे यांचे गणित ‘आरी’ बिघडविण्याची शक्यता होतीच. भाजपाचे देवरावदादा भोंगळे यांच्या प्रचारात महिला व तरुण वर्गाने उत्फूर्त भाग घेतला होता. परिणामी देवराव दादा यांनी अखेर 4232 मतांची आघाडी घेत बाजी मारली.
राजुरा विधानसभा निवडणुकीत 1 लाख 23 हजार 591 पुरुष मतदारानी मतदान केले तर 1 लाख 12 हजार 919 महिला मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला 2 इतर मतदान झाले. एकूण 2 लाख 36 हजार 512 मतदार तर 14 उमेदवार होते. मतमोजणी 25 फेऱ्यांमध्ये झाली.120 कर्मचारी मतमोजणीसाठी होते तर ई व्ही एम चे 14 टेबल होते. मतमोजणी साठी निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी रवींद्र माने आणि तहसीलदार डाॅ. ओमप्रकाश गौड यांनी कर्तव्य बजावले.