By : Rajendra Mardane
वरोरा : राज्यात १५ व्या विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले गेले असून ७५ – वरोरा – भद्रावती विधानसभा मतदारसंघात १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावण्यासाठी उतरले आहेत. बहुरंगी लढतीमुळे निवडणूक रंगतदार झाली असून जनतेची उत्कंठा वाढवणारी ठरत आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचार सभा, उमेदवार व समर्थकांकडून गल्लोगल्ली होणाऱ्या प्रचार फेऱ्या, बैठकांमुळे रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. यंदा राजकीय स्थित्यंतर होण्याची चाहूल जाणवत असून समीकरणे बदलली आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यासोबत असलेले पदाधिकारी, नेते आता स्वबळावर विधानसभेच्या आखाड्यात आपली ताकत अजमावत आहेत. महायुती व महाआघाडीच्या प्रचार सभा तसेच रॅलीत ऐक्याचे चित्र दिसत आहे पण हे ऐक्याचे चित्र प्रत्यक्षात मतदानात उमटणार का ? याबाबत जनतेत साशंकता आहे. उलट अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराचा झंझावात बघता वरोरा विधानसभा क्षेत्रात बहुरंगी लढत होऊन धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली जात आहे.
*वरोरा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले उमेदवार*
वरोरा विधानसभेसाठी प्रवीण काकडे (काँग्रेस), करण देवतळे (भाजपा), अहेतेशाम अली ( प्रहार जनशक्ती पार्टी ), अनिल धानोरकर (वंचित बहुजन आघाडी ), प्रवीण सूर ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना), सागर वरघने ( बहुजन समाज पार्टी ), डॉ. जयवंत काकडे ( बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी ), सेवकदास बरके (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया) , अपक्ष उमेदवार म्हणून मुकेश जीवतोडे, डॉ. चेतन खुटेमाटे, विनोद खोब्रागडे, राजू गायकवाड, अतुल वनकर, तारा काळे, प्रवीण खैरे, मुनेश्वर बदखल, श्रीकृष्ण दडमल, सुभाष ठेंगणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वरोरा विधानसभेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता कुणाला कौल देणार यांची उत्सुकता कायम आहे.
*विधानसभा निवडणूक खासदार धानोरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची*
लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाल्याने काँग्रेसचे मनोबल व आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे हमखास विजयाची खात्री बाळगून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या लाडक्या भावाला म्हणजे प्रवीण काकडे यांना वरोरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली आहे. बरेचदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनता फरक करते. त्यामुळे आता विधानसभेत मागील मतप्रवाह कायम राहणार का ? हाही मोठा प्रश्न आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असलेले मुकेश जीवतोडे , पूर्व काँग्रेस समर्थक असलेले डॉ. चेतन खुटेमाटे अपक्ष उमेदवार म्हणून तसेच दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे भाऊ अनिल धानोरकर हे वंचित बहुजन आघाडी तर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांची उपस्थिती काँग्रेस उमेदवारासाठी ” खतरे की घंटी ” ठरण्याची शक्यता आहे, असे जनतेत बोलल्या जात आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतीलच, असे ठामपणे निक्षून सांगणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना आपल्या बालेकिल्ल्यात प्रवीण काकडे यांना निवडून आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार, असे चित्र सध्या दिसत आहे. खासदार धानोरकर यांना सहज सोपी वाटणारी लढाई बहुरंगी लढतीमुळे अधिक खडतर बनली आहे. वरोरा मतदारसंघात आपली प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी खासदार धानोरकर यांना आधी स्वकियांचे आव्हान मोडीत काढून मतविभाजन टाळण्याचे दिव्य पार पाडावे लागणार आहे.
*करण देवतळे भाजपचे प्रथम आमदार ठरू शकतात*
विधानसभा निवडणुकीत ७५ – वरोरा – भद्रावती मतदारसंघात भाजपाचे टिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न न करताही शर्यतीमध्ये असलेल्या उमेदवारांना डावलून भाजप पक्षश्रेष्ठींनी करण देवतळे यांच्यावर विश्वास दाखवला, हे उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे वरोरा भद्रावती मतदारसंघात आतापर्यंत भाजपचा उमेदवार निवडून आलेला नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ६७ हजार ७०२ मते मिळाली होती. ही मते काँग्रेस च्या तुलनेत जवळपास ३७ हजारांनी कमी असली तरी यावेळी वरोरा मतदारसंघात बंडखोरी व अपक्षामुळे होणारी बहुरंगी लढत बेरीज – वजाबाकी करणाऱ्या ठरु शकतात. वरोरा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्याचे मोठ्या प्रमाणात होणारे विभाजन लक्षात घेता करण देवतळे भाजपचे प्रथम आमदार ठरू शकतात.
*धानोरकर, जीवतोडे, खुटेमाटे, अली, सूर, खोब्रागडेंच्या जोरदार प्रचाराने लढत लक्षवेधी*
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ( महायुती) विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ( महाविकास आघाडी) अशी दुहेरी लढत होऊन वरोरा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी वरचढ ठरली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवारा निवडून येणार, असे चित्र असतांना माजी नगराध्यक्ष अनील धानोरकर, मुकेश जीवतोडे, डॉ. चेतन खुटेमाटे, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, माजी जि.प. सदस्य प्रवीण सूर, राजू गायकवाड, विनोद खोब्रागडे,सागर वरघने याच्या उमेदवारीने कुणबी, तेली, माना, मुस्लिम, दलित, आदिवासी समाजाची गठ्ठा मते विभागली जाणार आहेत. त्यामुळे याचा कमी जास्त प्रमाणात फटका भाजप व काँग्रेस उमेदवारालाही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेला स्थानिक प्रश्न आणि सहज उपलब्ध होणाऱ्या उमेदवारास अधिक पसंती देण्याची शक्यता लक्षात घेता लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेला लबंक या विधानसभा निवडणुकीत महायुती/ महाआघाडी/ अपक्षांच्या बाजूने झुकू शकतो. जातीय समीकरणे, बडखोरी आणि अपक्षांच्या प्रभावामुळे होणारी मतविभागणी लक्षात घेता निकालाचा अंदाज बांधणे सध्या कठीण आहे. निवडणुकीची रंगत रंजक वळणावर आली असल्याने बहुरंगी लढतही लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.