By : Devanand Sakharkar
पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यात विकासाची दीर्घ मालिका तयार केली आहे. पोंभुर्णा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहावा यासाठी आरोग्य, शिक्षण, शेती, सिंचन, रोजगार स्वयंरोजगार या महत्त्वपूर्ण विषयावर भर देण्यात येत आहे, असे सांगत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्याचे भविष्य घडविण्याचा संकल्प केला असल्याचा विश्वास नागरिकांना दिला.*
पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी (तुकूम) येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. ‘आरोग्य क्षेत्रात उत्तम रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, शाळा, आय.एस.ओ. प्रमाणित अंगणवाडी, तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय केलेत. तसेच डोंगरहळदी गावात अनेक विकासात्मक कामे करण्यात आली असून गाव विकासासाठी निधी कमी पडू दिला नाही. जात-पात, धर्म न पाहता या मतदारसंघाचे नावलौकिक वाढावा या दृष्टीने कामे केली आहे,’ असंही ते म्हणाले.
‘पोंभुर्णामध्ये लक्ष्मी मित्तल ग्रुपचा उद्योग उभा राहत आहे. या ठिकाणी पोंभुर्णा तालुक्यातील 20 हजार तरुणांना थेट रोजगार तर 80 हजार तरुणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपये धानाचा बोनस देण्याचे काम महायुती सरकारने केले असून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र व राज्य शासनाचे मिळून 12 हजार देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून 15 हजार देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. जात, धर्म न पाहता मतदार संघात विकासाची कामे पूर्णत्वास नेली,’ याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
*आवास योजनेचे अनुदान वाढवले*
घरकुलाचे लक्षांक वाढविण्यात आले असून या मतदारसंघातील गोरगरिब, माती-कुडाच्या घरात राहणाऱ्यांना येत्या पाच वर्षात घरकुले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शबरी व रमाई आवास योजनेचे अनुदान 2.50 लाख केले. शेतकरी सुखी व्हावा यादृष्टीने कार्य करण्यात येत आहे. येत्या काळात मालगुजारी तलावाच्या माध्यमातून प्रत्येक गावात सिंचनाची व्यवस्था करण्यात येणार असून अंधारी व उमा नदीवर बंधारे बांधण्याचे कार्य करण्यात येणार आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने काम करेल, अशी ग्वाही ना.मुनगंटीवार यांनी दिली.
*बचत गटांना 25 लक्ष*
ते पुढे म्हणाले, महायुती ही सर्वांच्या सेवेसाठी आहे.पोंभुर्णा तालुक्याचे भविष्य घडविण्याचा संकल्प घेऊन कार्य करण्यात येत आहे. महिला बचतगटासाठी ग्राम संघाला 25 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. एवढ्यावरच न थांबता बचत गटातील महिलांना उत्पादित वस्तू थेट विकता याव्यात यासाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारण्यात येत असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.