By : Arvind Khobragade
चंद्रपूर :
चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत होईल असे चित्र तूर्तास दिसत असले तरी प्रमुख लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात होईल अशी शक्यता आज तरी दिसते आहे. यात ब्रीजभूषण पाझारे आणि राजू झोडे यांना किती पाठबळ मिळेल यावर विजयी उमेदवार भाजप की काँग्रेसचा हे निश्चित होईल.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 3 लाख 72 हजार 455 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसला ही जागा सुटली असून प्रवीण पडवेकर या कार्यकर्त्यास मैदानात उतरविण्यात आले आहे. तर महायुतीचे भाजपचे किशोर जोरगेवार दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत.जोरगेवार यांचा राजकीय प्रवास रंजक आहे.गेल्या महिन्याभरात त्यांनी वेगवेगळ्या पक्षांचे दरवाजे ठोठावली आणि अखेर आपल्याच मूळ पक्षात प्रवेश करीत उमेदवारी मिळविली. मात्र त्यांना उमेदवारी जाहीर होताच अनेक वर्षे भाजपशी एकनिष्ठ राहिलेले ब्रीजभूषण पाझारे यांनी बंडखोरी(त्यांचे भाषेत उठाव…) केली.पाझारे यांची उमेदवारी जोरगेवार यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.पाझारे यांना भाजपमधील एक गट पूर्णपणे सहकार्य करेल अशी शक्यता नाकारता येत नाही. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जोरगेवार यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून असलेला विरोध आणि पाझारे यांची उमेदवारी यात बराच सार सामावला असल्याने भाजपचे मतदार कितपत जोरगेवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात हे लवकरच स्पष्ट होईल.
जोरगेवार यांनी मागील निवडणुकीत विक्रमी मते घेतली.1 लाख 17 हजार पेक्षा जास्त मते घेत ते निवडणूक आलेत.शहरातील सर्व जाती धर्मातील मतदार,तरुण,वृद्ध त्यांच्या पाठीशी उभे राहिले. भाजपचे नाना शामकुळे यांचेप्रती असलेली नाराजी जोरगेवार यांच्या पथ्यावर पडली.200 युनिट वीज मोफत उपलब्ध करून देण्याचे भरीव आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र गेल्या पाच वर्षात महाकाली महोत्सव याव्यतिरिक्त जोरगेवार यांचे भरीव कार्य दृष्टीस पडत नाही. मतदार संघाच्या विकासापेक्षा त्यांनी गुवाहाटी ते मुंबई हाच प्रवास करीत स्वतःचा विकास साधल्याची भावना मतदारसंघात व्यक्त होत आहे. यावेळी त्यांना मागील वर्षी सारखा भरघोस पाठींबा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.त्यात पाझारे यांना वाढत असलेला प्रतिसाद जोरगेवार यांची चिंता वाढविणारा आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदा घुघुस परिसरातील दमदार उमेदवार पाझारे यांच्या रूपाने मैदानात आहे.त्यामुळे त्या परिस्थितीत घुगूस व ग्रामीण पट्ट्यातील मतदार पाझारे यांच्या मागे उभे राहिल्यास ते मुसंडी मारू शकतात.
काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर दमदार या सदरात मोडणारे नाहीत. मात्र एका सामान्य कार्यकर्त्यास काँग्रेसने तिकीट दिल्याची मतदारांमध्य वाढत जात असलेली भावना ही पडवेकर यांच्यासाठी जमेची बाजू आहे. महाविकास आघाडीचे सरकार असावे या मताशी जो मतदार सहमत आहे, तो मतदार काँग्रेसच्या मागे उभा राहिला आणि काँग्रेसची पारंपरिक मते तसेच लोकसभा निवडणुकीप्रमाणे बौद्ध आणि मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले तर पडवेकर यांची लॉटरी लागू शकते. मात्र त्यासाठी पडवेकर यांना केवळ पक्षनिधी येईल आणि मगच प्रचाराचा बार उडवू ही मानसिकता सोडावी लागेल. जनसंपर्क आणि स्वतःची प्रतिमा उंचविण्याचे आव्हान त्यांना पार पाडावे लागेल तरच नशिबाने मिळालेल्या संधीचे सोने करता येईल.तरुण मतदार सामाजिक माध्यमातून पडवेकर यांना शोधत आहेत.मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा मागमूसही त्यांना शिवला नसावा अशी शक्यता दिसते आहे. तरुण मतदार त्यांना सोसिएल मीडियावर शोधून थकली अशी तरूणाई बोलते आहे.
पडवेकर यांना खरा धोका आहे तो राजू झोडे यांच्या उमेदवारीचा. झोडे हाडाचे कार्यकर्ते असून त्यांची ओळख संपूर्ण मतदारसंघात आहे. त्यांच्या पाठीशी शहरातील सर्व धर्मिय कार्यकर्ते उभे असुन तेच संपूर्ण
प्रचार यंत्रणा राबवित आहेत.शहरात प्रचाराचा झंझावात सुरू असून काँग्रेसने कसा अन्याय केला हे ते पटवून देत आहेत. महाविकास आघाडी हवी असेल तर झोडे हेच जिंकणे आवश्यक असल्याचे बाब बिंबविण्यात कार्यकर्ते यशस्वी होत आहेत. आर्थिक पाठबळ खूप नसले तरी पडवेकर यांच्या उमेदवारीसाठी ज्यांनी विरोध केला ती शक्ती झोडे यांचे मागे उभे राहिली तर मात्र पडवेकर यांची अडचण होऊ शकते.
चंद्रपूर क्षेत्रात मुस्लिम आणि बौद्ध मतदार निर्णायक ठरतात. यावेळी वंचित चा उमेदवार नसल्याने जवळपास 15 ते वीस हजार मते कुणाच्या पारड्यात जातात यावर बरेच अवलंबून राहणार आहे.
तूर्तास निवडणूक सुरू झाली असून रंग आलेला नाही मात्र रंगतदार वळणावर येत असून काँग्रेस-भाजप अशी थेट असलेली लढत चौरंगी झाली असून चारही उमेदवार ताकदवान असल्याने कोण जिंकेल हे सांगणे आजतरी कठीण आहे.
अरविंद खोब्रागडे,
9850676782