निवडणूक प्रक्रिया जबाबदारीने पार पाडा : जिल्हाधिकारी गौडा

By : Devanand Sakharkar

चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ची घोषणा होताच जिल्ह्यात सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अधिका-यांनी निवडणूक प्रक्रिया जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे
नियोजन सभागृह येथे नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी संजय पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्णा बासुर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया अतिशय जबाबदारीने पार पाडावी. त्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योग्य नियोजन करावे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रामध्ये किमान मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे. यात फर्निचर, लाईट व्यवस्था, शौचालय आणि त्याची स्वच्छता, प्रतीक्षालय, शेडची व्यवस्था, मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या असल्यास ठराविक अंतरावर खुर्च्यांची व्यवस्था, आदी बाबी सज्ज ठेवाव्यात.
तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर स्थानिक स्तरावरील एन.सी.सी. आणि एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नियुक्त करावे. शहरी भागात जेथे तीन पेक्षा जास्त मतदान केंद्र एकाच ठिकाणी आहे, अशा ठिकाणी पार्किंग व्यवस्था योग्य ठेवावी. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही अधिकारी -कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये. मुक्त आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी आंतरराज्यीय चेकपोस्ट वर अधिकारी कर्मचाऱ्यांची तात्काळ ड्युटी लावावी. या चेक पोस्टवर पोलिस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि वनविभागाचे अधिकारी -कर्मचारी सुद्धा तैनात ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.
यावेळी सादरीकरण करताना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी नोडल अधिकाऱ्यांनी करावयाची कारवाई, आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागाने करावयाची कामे, तसेच आचारसंहितेच्या काळात काय करावे आणि काय करू नये, याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले
*जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली राजकीय पक्षांची बैठक* : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांनी दोन सहाय्यक नियुक्त करावेत. विधानसभा मतदारसंघ स्तरावर मदतीसाठी हेल्पडेस्क राहणार आहे. तसेच सर्व परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टीम सुद्धा कार्यान्वित केली जाईल. निवडणूक प्रचाराकरीता महत्त्वाचे, अति महत्त्वाचे व्यक्ती येत असल्यास याबाबत राजकीय पक्षांनी प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी. राजकीय पक्षांनी प्रत्येक सभेसाठी परवानगी घ्यावी. वाहनांच्या वापरावर निर्बंध असून एका ताफ्यामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरण्याची परवानगी राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरणे, अनामत रक्कम, निवडणुकीचा कार्यक्रम आदीबाबत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना अवगत केले.
*राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची उपस्थिती* : बैठकीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पाटी, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), स्वतंत्र भारत पक्ष, जय विदर्भ पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००००

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *