by : Shankar Tadas
राजुरा : गोंडवाना विद्यापीठाने वेळोवेळी युजीसीच्या निर्देशानुसार परिपत्रके व अध्यादेश निर्गमित केले आहेत परंतु असे परिपत्रके व अध्यादेश निर्गमित करीत असताना यूजीसीच्या निर्देशानुसार कार्यवाही न करता आपल्या सोयीनुसार कार्यवाही करीत असल्याने पीएचडी संशोधन प्रकियेमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या असून यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने गोंडवाना विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांना पीएचडी संशोधन प्रक्रियेतील विविध अडचणी सोडवण्याच्या संदर्भात निवेदन दिले आहे .
गोंडवाना विद्यापीठाच्या आचार्य पदवी प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण झाल्या असून संशोधक विद्यार्थी व मार्गदर्शक यांना मानसिक व शारीरिक त्रास होत आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने निवेदनातून अनेक मागण्या सादर करण्यात आल्या यामध्ये संशोधन केंद्रांना मान्यता द्यावी, समूह संशोधन केंद्र निर्माण करावे, संशोधन केंद्राला मान्यता देताना दोन संशोधन मार्गदर्शकांची अट रद्द करावी, मौखिक चाचणी आणि आचार्य पदवीची अधिसूचना सहा महिन्याच्या आत निर्गमित करावी, आचार्य पदवी विभागात येणारे बाह्य परीक्षक, मार्गदर्शक, विद्यार्थी यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, संशोधक विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा त्याच त्याच कागदाची मागणी करू नये, संशोधन प्रबंध सादर केल्यानंतर प्रगतीचा स्टेटस माहिती होण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करावा, आचार्य पदवीची मौखिक परीक्षा बाह्य परीक्षकाला ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मुभा द्यावी या मागणी सह आचार्य पदवी प्रक्रियेतील अनेक मागण्यांचा समावेश आहे.
यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ.विवेक गोरलावर यांच्या स्वाक्षरीचे निवेदन विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांना संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर विजय वाढई, सिनेट सदस्य डॉ.सतीश कन्नाके, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अक्षय धोटे,डॉ.सावलिकर, डॉ. प्रकाश शेंडे, डॉ.निलेश चीमुरकर डॉ.उर्वशी माणिक,डॉ. शैलेंद्र शुक्ल, डॉ. सिसोदिया इत्यादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर समस्यांचे निवेदन दिले असून यासंदर्भात प्रं- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून सदर समस्या सोडवण्याचे आश्वासन शिस्त मंडळाला दिलेले आहे.