By : Shankar Tadas
कोरपना : प्रभू रामचंद्र विद्यालय, नांदाची संचालक संस्था वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळ, चंद्रपूर याच्या अध्यक्ष सुनीता लोढिया यांनी आपल्याच संस्थेचे सचिव अनिल मुसळे आणि उपाध्यक्ष वसंत आवारी यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती आज रविवारी पत्रकारांना दिली.
प्राचार्य, मुख्याध्यापक, सचिव अनिल मुसळे तसेच उपाध्यक्ष वसंत आवारी यांनी संस्थेच्या न्यायिक व आर्थिक व्यवहाराची माहिती अध्यक्षांपासून दडवून ठेवली. संस्थेच्या आर्थिक व्यवहारात अफरातफर केली, पात्रता नसताना अनिल मुसळे यांनी स्वतःला मुख्याध्यापक पदावर नेमले, अध्यक्ष यांच्या खोट्या सह्या करून बरेच गैरव्यवहार केल्याचा आरोप लोढिया यांनी तक्रारीत केलेला आहे. पत्रकार परिषदेला संस्थेच्या एकूण 11 सदस्यांपैकी अध्यक्ष व तीन सदस्य उपस्थित होते.
यासंदर्भात संस्थेचे सचिव अनिल मुसळे यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याला पदावरून किंवा संस्थेतून काढण्याचा अधिकार अध्यक्ष यांना नसल्याचे सांगून धर्मदाय आयुक्त जे आदेश देतील ते मान्य करू असे सांगितले. अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यासाठी वेळोवेळी सुचवूनही दुर्लक्ष करण्यात आले. बहुमत सुनीता लोढिया यांच्या बाजूने नसल्याने त्यांनी निवडणूक टाळण्याचाच प्रयत्न केला. आता त्वरित निवडणूक घेण्यासाठी धर्मादाय आयुक्ताचे आदेश असल्यामुळे गंभीर आरोप त्या करीत आहेत. आपण निवडणुकीनंतर सविस्तर माहिती देऊ अशी प्रतिक्रिया अनिल मुसळे यांनी दिली.