By : Shankar Tadas
कोरपना : रिझर्व बँकेच्या गोडाऊनमध्ये खराब झालेल्या नोटा रद्द करून सिमेंट कंपनीमध्ये जाळल्यात आल्या. तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीतही बँक अधिकारी व पोलिसांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सोमवार आणि मंगळवारी पार पडली. मात्र, याबद्दल माहितीअभावी परिसरात 300 कोटी रुपयांच्या नोटा जाळल्याची चर्चा दिसून आली. मात्र जाणकारांकडून प्राप्त माहितीनुसार, रिझर्व बँक खराब झालेल्या नोटा रद्द करून त्याच क्रमांकाच्या नवीन नोटा तयार करते. आणि रद्द नोटा तुकडे करून सिमेंट कंपनीत जाळून नष्ट करते. तीच प्रक्रिया दालमिया सिमेंट कंपनीत पार पडली. या नोटा दोन कंटेनरमधून नागपूर येथून आणण्यात आल्या होत्या. मात्र, या प्रक्रियेची माहिती सामान्य जनतेला नसल्याने दोन दिवस याबद्दल चर्चा कंपनी परिसरात सुरू होती.