प्रसादाच्या लाडूत चरबी…! गोविंदा….गोविंदा…!

लोकदर्शन विशेष
By : Shankar Tadas
देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान असलेल्या ‘तिरुपती’च्या प्रसाद लाडूमध्ये पशूची चरबी आणि माशाचे तेल आढळून आल्याचा आरोप खुद्द मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्याने देशभर एकच खळबळ उडाली आहे. देवाच्या नावाने सुरू असलेल्या मोठ्या संस्था राजकारणाचे साधन झाल्याने आरोप-प्रत्यारोप होणे स्वाभाविक आहे. मात्र या आरोपात तथ्य असल्याचा अंदाज बांधणे कठीण नाही. आज बाजारात मिळणारी कोणतीही वस्तू शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. वस्तूंची शुद्धता तपासणाऱ्या शासनाच्या कोणत्याही यंत्रणा 100 टक्के विश्वसनीय असल्याचा दावा कोणीच करत नाही. पळवाटा खूप असतात. त्यामुळे भेसळ ही सर्वच पातळीवर शक्य आहे. येथे प्रश्न आहे तो वेज आणि नॉनवेजचा.
हिंदू मुळात शाकाहारी. त्यातही देवाचा प्रसाद सर्व प्रकारे शुद्धता पाळून तयार केला जातो. हे आचरण व्यक्तिगतरीत्या महत्वाचे तसेच संस्थांनाही लागू आहे. मात्र हिंदूंची मोठी कमाई असलेली देवस्थाने आता व्यावसायिक दृष्टिकोन अधिक तर आस्था आणि भावनेला कमी महत्व देताना दिसतात. त्यातही कळस म्हणजे या संस्था स्थानिक किंवा राज्याच्या राजकारणाचा मोठा आधार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या संस्था आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात. या संस्थांचा कारभार भक्तीला पोषक किती यापेक्षा राजकीय शक्तीला किती लाभदायी याकडे अधिक लक्ष दिले जाते. त्यामुळे येथे प्रसादच नव्हे तर सर्व व्यवस्थाच दूषित असल्यास नवल काहीच नाही.
भक्तिभावाने प्रेरित संस्था पदाधिकारी आणि सेवावृत्तीचा कर्मचारी वर्ग ज्या देवस्थानकडे आहे तिथेच पवित्र वातावरणाची अपेक्षा केली जाऊ शकते. अर्थातच संस्थेत कितीही भोंगळ कारभार सुरू असला तरी देव अशुद्ध होत नाही. या घटनेच्या निमित्ताने देवाच्या नावाने कमाईवर डोळा ठेवून असलेल्या मोठ्या माशांचे पितळ उघड झाले आहे. मंदिरे भाविकांसाठी असावी की ग्राहकांसाठी हा सामान्य जनतेचा प्रश्न सत्ताधाऱ्यानी लक्षात घेऊन योग्य पाऊले उचलावीत ही माफक अपेक्षा.
: शंकर तडस
9850232854

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here