लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय, गडचांदुर येथे इंग्रजी, इतिहास आणि शरिरिक शिक्षण विभागाच्या वतीने “करिअर कोंसिलिंग ऑन कंपनी सेक्रेटरी” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉ. राजेश गुप्ता डेप्युटी डायरेक्टर, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी (ICSI) दिल्ली हे होते.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणापेक्षा कंपनी सेक्रेटरी सारख्या अभ्याक्रमाकडे वळून आपले करिअर कसे बनवावे यावर मार्गदर्शन करताना ते याप्रसंगी बोलत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, आधुनिक युगात जगातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले आहे. या दृष्टीने सर्व क्षेत्रातील नूतनीकरणामुळे अनेक बदल झाले आहेत. सार्वजनिक कंपन्यांच्या तुलनेत खाजगी कंपन्याचा बाजारात चांगलाच प्रभाव दिसून येतो आहे.अश्या औद्योगिक-संबंधित क्षेत्रातील कामांची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षित आणि उच्च शिक्षित मानवी संसाधनांना खूप महत्त्व असणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनी यापुढे आपला कल खासगी क्षेत्राकडे वाढविण्याची गरज आहे असे ते याप्रसंगी म्हणाले. विद्यार्थ्यांनी केवळ विद्यापीठाची पदवी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा सर्वांगिण बौद्धिक विकास कसा साधता येईल या कडे विशेष लक्ष द्यायला हवे असेही ते म्हणाले.
“कंपनी सेक्रेटरी” हा अभ्याक्रम भारत सरकार पुरस्कृत उपक्रम असून अत्यंत कमी शुल्का मध्ये विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या जमाती यांना अभ्याक्रम शुल्कात पन्नास टक्के सवलत तर विकलांग आणि ज्यांचे पालक सैन्यात शहीद झाले असेल अश्या पाल्यांना अभ्याक्रम शुल्कात 100% सुट देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. याच अभ्याक्रम शुल्कात विद्यार्थांना स्टडी मटेरिल, अभ्याक्रमिक पुस्तके आणि ऑनलाईन क्लासेस निःशुल्क मिळणार आहे. भारत सरकारच्या उपक्रमाचे “स्वयम्”
(Swayam )ॲप द्वारे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेचे मोफत ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ मिळत असल्याचेही डॉ. राजेश गुप्ता यांनी नमूद केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिनेट सदस्य तथा गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्रा. डॉ. संजय गोरे, कार्यक्रम समन्वयक तथा इंग्रजी विभाग प्रमुख
प्रा. डॉ. सुनील बिडवाईक, प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी, प्रा.डॉ.राजेश गायधनी, प्रा.डॉ.शरद बेलोरकर, प्रा.डॉ. माया मसराम, प्रा. मंगेश करंबे, प्रा.डॉ. सतेंदर सिंह हे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रा. डॉ. संजय गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध स्पर्धा परीक्षेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा वेळोवेळी आवर्जून दिल्या पाहिजे तसेच आपल्या फॅकल्टी च्या अभ्यासा सोबत इतरही अभ्यासक्रमांना प्राधान्य दिलं पाहिजे असे विशद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक, महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुनिल बिडवाईक यांनी केले. याप्रसंगी त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. शरद बेलोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सतेंदर सिंह यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले.