,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा :👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. घडलेली घटना निषेधार्थ असून यास जबाबदार असणाऱ्या संबंधित व्यक्ती व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर असलेला 35 फुटी पूर्णाकृती पुतळा सोमवारी अचानक कोसळला. आठ महिन्यापूर्वी नौदल दिनानिमित्ताने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. केवळ आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीत महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई करण्यात आली का?असा सवाल उपस्थित होत आहे.सदर पुतळ्याच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार व प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा अवमान झाला आहे. या घटनेमुळे राज्यातील प्रत्येक शिवप्रेमी नागरिकांच्या मनात तीव्र संताप उफाळला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदार, पीडब्ल्यूडी चे भ्रष्ट अधिकारी व इतर यंत्रणेच्या बेजाबाबदार अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे.अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,शहराध्यक्ष विजय खांडेभराड,रवी इंगळे,अजबराव मुंढे, संतोष शिंगणे,सचिन कोल्हे,सुनील म्हस्के,संतोष जाधव, जना मगर, ऋषिकेश शिंगणे, संतोष घोंगे,निलेश शिंदे,अंकुश रामाने आदींनी केली आहे.