तब्बल ४० वर्षानंतर कढोली खुर्द येथे काँग्रेसची सत्ता

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – कढोली खुर्द येथील शेतकरी संघटनेच्या सरपंच अपात्र झाल्याने ग्रामपंचायतीवर 40 वर्षानंतर पहिल्यांदा काँग्रेसचे सरपंच विराजमान झाले असून सरपंचपदी काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला मरस्कोल्हे यांच्या विरोधात गैरव्यवहाराची तक्रार दाखल करण्यात आल्याने व ती सिद्ध झाल्याने त्यांना सरपंचपदावरून पायउतार आले होते. अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या येथील सरपंचपदासाठी काँग्रेसचे उमाजी आत्राम आणि त्यांची पत्नी रंजना आत्राम हे दोनच सदस्य पात्र होते. त्यामुळे २६ ऑगस्टला पार पडलेल्या सरपंच निवड प्रक्रियेत गट ग्रामपंचायत कढोली खु. अंतर्गत येत असलेल्या बोरी नवेगाव येथील उमाजी जगन्नाथ आत्राम यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली.
एकूण नऊ सदस्यांपैकी आसन खुर्द येथील निर्मला मरस्कोल्हे आणि मायकलपूर येथील सीता पंधरे यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यामुळे सात सदस्य शिल्लक राहिले. काँग्रेसचे सरपंच उमाजी आत्राम, शेतकरी संघटनेचे उपसरपंच विनायक डोहे, सदस्य प्रशांत मसे, भास्कर मत्ते, रंजना उमाजी आत्राम, गीता जुनगरी व वृंदा वडस्कर सदस्य शिल्लक आहेत.
कढोली खुर्द गावात अनुसूचित जमातीतील एकही सदस्य नसल्याने बोरी नवेगावच्या सदस्याला प्रथमच सरपंचपदाची संधी मिळाली आहे.

उपसरपंचावर अविश्वासाची टांगती तलवार

शेतकरी संघटनेचे केवळ दोनच सदस्य शिल्लक असल्याने उपसरपंच विनायक डोहे यांच्यावर अविश्वासाची टांगती तलवार आहे. सत्ताधारी उपसरपंचावर लवकरच अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *