By : Shankar Tadas
कोरपना : सत्ताप्राप्तीसाठी दोन्ही बाजूने अगदीच अटीतटीचे प्रयत्न सुरू असतानाच अखेर कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला मरस्कोल्हे यांच्या विरोधात गैरव्यवहाराची तक्रार सिद्ध झाल्याने त्यांना सरपंचपदावरून हटविण्यात आले होते. आदिवासीकरिता राखीव असलेल्या येथील सरपंचपदासाठी काँग्रेसचे उमाजी आत्राम आणि त्यांची पत्नी रंजना आत्राम हे दोनच सदस्य पात्र होते. त्यामुळे आज, 26 ऑगस्ट 2024 रोजी पार पडलेल्या सरपंचपद निवड प्रक्रियेत बोरी नवेगाव येथील उमाजी जगन्नाथ आत्राम यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली. एकूण नऊ सदस्यांपैकी आसन खुर्द येथील निर्मला मरस्कोल्हे आणि मायकलपूर येथील सीता पंधरे यांचे सदस्यत्व रद्द झालेले आहे. आता सरपंच उमाजी आत्राम, शेतकरी संघटनेचे उपसरपंच विनायक डोहे, सदस्य प्रशांत मसे, भास्कर मत्ते (आसन खुर्द, ), रंजना उमाजी आत्राम(बोरी नवेगाव ), गीता जुनगरी, वृंदा वडस्कर सदस्य आहेत.
यापूर्वी उमाजी आत्राम यांची पत्नी रंजना आत्राम यांची सदस्यपदी अविरोध निवड झाली होती. काँग्रेसने सुरुवातीला खूप प्रयत्न करूनही सरपंचपदाने हुलकावणी दिली होती. मात्र सतत केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आल्याचे दिसून येत आहे. बोरी नवेगाव आणि आसन खुर्द हे दोन्ही गाव मिळून एक वार्ड असून तीन सदस्य असतात. या वार्डाकडे प्रथमच सरपंचपद मिळाले होते. मात्र दीड वर्षे शिल्लक असतानाच आसन खुर्द येथील निर्मला मरस्कोल्हे यांना पदावरून हटावे लागले. मात्र दोन वार्ड असलेल्या कढोली खुर्द गावात आदिवासी उमेदवार नसल्याने बोरी नवेगावच्या सदस्याला प्रथमच सरपंचपदाची संधी लाभली आहे.
सध्या उपसरपंच शेतकरी संघटनेचे आणि सरपंच काँग्रेसचे असे समीकरण असून भाजपाची भूमिका सध्यातरी गुलदस्त्यात आहे. त्यामुळे येत्या येत्या काळात मोठ्या घडामोडीची शक्यता नाकारता येत नाही.
(ग्रामपंचायत कढोली खुर्द एक व्हिडीओ अवश्य पहा )