लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत अनेक संलग्नित महाविद्यालय असुन त्यात वेगवेगळ्या विषयाचे अनेक शिक्षक पूर्णवेळ सेवारत असून आपली अध्ययन सेवा नियमितपणे पार पडत आहे महाविद्यालयात विविध विभागाचा, महाविद्यालयाचा प्रभार देताना सेवा जेष्ठता महत्वाची मानली जाते. परंतु सेवा जेष्ठताबाबत महाविद्यालय शिक्षकामध्ये संभ्रमावस्था असल्याने अनेकदा वादविवाद निर्माण होवुन हे वाद विद्यापीठ, न्यायालयापर्यंत जातात. त्याचा परिणाम महाविद्यालय, शिक्षक व महाविद्यालयीन कामकाजावर पडतो. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाने शिक्षकांच्या सेवा जेष्ठतेबाबत परिपत्रक काढावे अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोरलावार यांनी कुलगुरू कडे केली आहे.
महाविद्यालयीन शिक्षकाच्या सेवा जेष्ठता बाबत विद्यापीठ अनुदान आयोग,महाराष्ट्र शासन, विद्यापीठाच्या नियमाविषयी स्पष्ट माहिती देणारे परीपत्रक प्रकाशित करुन महाविद्यालयीन शिक्षकाच्या सेवा जेष्ठता बाबत संभ्रम दुर करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.