By : Shankar Tadas
गडचांदूर : कोरपना तालुक्यात गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील गडचांदूर -भोयेगाव मार्गावरील लखमापूर निमणी गावाजवळ भरधाव व्हॅगनार कारणे उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कार मधील पाच पैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सदर घटना 12 ऑगस्ट रोजी मध्यरात्री अंदाजे एक ते दोन च्या सुमारास घडली. कार मधील सर्व जिवती तालुक्यातील असल्याचे समजते. ज्यामध्ये अजय विलास गायकवाड वय पंचवीस वर्ष राहणार कोलम जिल्हा आदिलाबाद यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांची गंभीर परिस्थिती बघता त्यांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. याशिवाय मृतकामध्ये सुजल नारायण गवाले वय 25 वर्ष राहणार शेणगाव तालुका जिवती, सुनील माधव केजगीर वय 28 वर्षे शेणगाव, आकाश गोविंदराव पंधरे वय 20 वर्ष चिखलीपाटन, श्रेयस बालाजी पाटील वय 22 वर्ष राहणार टाटा कुडाळ सर्व तालुका जिवती येथील रहिवासी असून हे पाचही जण चंद्रपूर वरून गडचांदूर मार्गाने गाडी क्रमांक एम एच 04 एफ आर 46 81 गावाकडे परत येत असताना बाखर्डी गावाशेजारी असणाऱ्या पाठक यांच्या दूध डेअरी जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम एच 18 एन 66 566 यावरती मागच्या बाजूला जाऊन आदळल्याने कारच्या समोरील बाजूचा संपूर्ण चुरा चुरा झाल्याचे दिसते. यामध्ये या चारही लोकांचा जागीच अंत झाला असून शिवाय रात्रीच्या वेळेला कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्यामुळे सकाळी हा अपघात निदर्शनास आला. अपघाताची माहिती गडचांदूर पोलिसांना पोलीस उपविभागीय अधिकारी जाधव यांच्या निर्देशानुसार गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कदम हे घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
याच मार्गावरती आठ दिवसांपूर्वी लखमापूर गावाशेजारी असणाऱ्या पेट्रोल पंप जवळ रात्रीच्याच सुमारास ट्रकला मागून धडक दिल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय मागील आठवड्यात कवठाळा येथील एक नागरिक ट्रकच्या धडकेत मरण पावला. या सर्व घटना ताज्या असतानाच पुन्हा भीषण अपघात घडल्याने रात्रीच्या वेळेला रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या ट्रक व इतर वाहनांच्या बाबतीत लोकांमध्ये संतापाची लाट पसरली असून गडचांदूर पोलिसांच्या माध्यमातून विविध कारवाई केल्या जात असताना सुद्धा गडचांदूर भोयेगाव गडचांदूर नांदा फाटा या मार्गावरती वाहने रस्त्यावरच पार्किंग करून असताना दिसतात त्यामुळे या संदर्भात कायमची उपाययोजना करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे