लोकदर्शन जिवती 👉 प्रा. गजानन राऊत
जिवती- विदर्भ महाविद्यालय जिवतीचे इतिहास विभाग, मराठी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून “भारतीय स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांचे योगदान” या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. सदर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अभिव्यक्त होताना म्हटले की, “या व्याख्यानमालेच्या माध्यमातून भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि या देशाला स्वातंत्र्याची पहाट दाखवण्यासाठी प्रसंगी आपला देह सुद्धा नोच्छावर केला, अशा महापुरुषांच्या योगदानांची जाणीव विद्यार्थ्यांना होऊन त्यांच्यामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोन विकसित व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले”.
याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा. गजानन राऊत, इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत पानघाटे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. सचिन यनगंदलवार यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नानाविध पैलूंवर प्रकाश टाकत क्रांतिकारकांच्या योगदानाचे सविस्तर विवेचन केले. सोबतच विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या शंकांचे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून व्याख्यात्यांकडून यथोचित निरसन करण्यात आले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष श्रम घेतले.