चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मिळणार संपूर्ण पिक विमा रक्कम

 

By : Shankar Tadas

चंद्रपूर :  अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आणखी मोठा दिलासा मिळाला आहे; राज्याचे कृषिमंत्री ना. श्री. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याची रक्कम कोणतेही कारण न सांगता ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी देण्याचे तसेच विहित मुदतीत अपात्र ठरविलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पात्र ठरविण्याचे कडक निर्देश विमा कंपनीला दिले. या सोबतच पिक विमा सर्वेक्षणा संदर्भातील त्रुटी आणि अडचणी बाबतही सखोल चर्चा करून कंपनीने शेतकऱ्यांना योग्य सहकार्य करण्याचे आदेशही कृषिमंत्र्यांनी दिले.

पिक विमा रकमेच्या संदर्भात तसेच पिक विमा कंपनीसंदर्भातील विविध तक्रारींसंदर्भात पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या दालनात आज विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या सचिव श्रीमती व्ही. राधा, मुख्य सांख्यकी वैभव तांबे कृषी आयुक्तालय ,विभागीय कृषि सहसंचालक नागपुर शंकर तोटावार ,ओरिएंटल विमा कंपनीचे मुंबई कार्यालयातील व विभागस्तरवरील अधिकारी व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे शिष्टमंडळ यांची सविस्तर बैठक पार पडली.
जिल्ह्यातील पिक विमा रकमेचा आढावा घेत असताना स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ऑनलाइन द्वारे ४२१८३आणि ऑफलाइन द्वारे १८८२० अशी एकूण ६१ हजार ३ शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात सूचनापत्र प्राप्त झाले; त्याच्यापैकी ४७,५४१ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात झाले. सर्व्हेक्षणाअंती १५७२९ शेतकऱ्यांची विमा रक्कम मंजुर करण्यात आली आणि २५,४३४ शेतकऱ्यांचा विविध कारणानी विम्याचे दावे विमा कंपनी कडून नाकारण्यात आले; परंतु उर्वरित सर्वं दावे मंजूर करून सर्वं शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्याचे आदेश आज बैठकीत देण्यात आले. विहित मुदतीत अपात्र न केलेले अर्जही पात्र करण्याबाबतचे आदेश आज कृषी मंत्र्यांनी दिले.

काढणी पश्चात जोखमी अंतर्गत शेतकऱ्यांचे ऑनलाइन ३९८२६ व उर्वरित ऑफलाइन ९४९२ असे एकूण ४९ हजार ३१८ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी २७ हजार ५२३ शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण केलेले नाही; ते सर्व अर्ज पात्र करण्याबाबत तसेच सर्वेक्षण केलेले २१ हजार ७९५ पैकी ९७१ शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आला. उर्वरित १९५६० शेतकऱ्यांचे विविध कारणामुळे नाकारण्यात आलेले अर्ज स्वीकारण्याचे आदेश आजच्या बैठकीत कृषिमंत्र्यांनी दिले.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यासाठी मंजूर रक्कम रुपये २०८ कोटी ४० लाख ३१ हजार पैकी १२७ कोटी ७४ लाख ११ हजार रुपये रक्कम प्रलंबित आहे. यापैकी तसेच उर्वरित सर्व रक्कम ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अदा करण्याचे कृषी मंत्र्यांच्या निर्देशानुसार विमा कंपनीने मान्य केले ; या रकमेपैकी ४० कोटी रुपये एवढी विम्याची रक्कम बुधवारी ऑनलाइन पोर्टलवर अदा करण्यासाठी अपलोड करण्यात आल्याचे विमा अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख ६६ हजार ९५५ शेतकऱ्यांना २०८ कोटी ४० लाख ३१ हजार रूपये विम्याची रक्कम नुकसान भरपाई पोटी देण्याचे शासनाने मंजूर केले. यापैकी ८६६५५ शेतकऱ्यांना ८० कोटी ६६ लाख २० हजार रुपये वाटप करन्यात आले आहे.

आज मंत्रालयात झालेल्या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक श्री. शंकर तोटावार तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील नंदू रणदिवे, बंडू गौरकर, शंकर विधाते, विनोद देशमुख, चंदू नामपल्लिवार, देवानंद नारमलवार, विवेक ठीकरे, सचिन गुरनुले आदी उपस्थित होते.

*पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची संवेदनशील भूमिका आणि पुढाकार!*

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा कदापी दुःखात असू नये, अतिवृष्टीमुळे त्याच्यावर आलेल्या संकटात आपण सर्वोपरि सहकार्य केले पाहिजे, शासनाकडून त्यांच्यासाठी कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पिक विमा योजनेचा विषय पूर्णतः लावून धरला. यासाठी प्रलंबित रक्कम मिळावी म्हणून कृषीमंत्र्यांची सर्वप्रथम भेट घेतली, त्यानंतर मुदत वाढीसाठी सुद्धा कृषिमंत्र्यांना भेटून अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून मंजूर करून घेतला. चंद्रपूर येथे नियोजन भावनात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना अहवाल तयार करायला सांगितला; यानंतर कृषिमंत्र्यांशी बोलून आज ही बैठक तातडीने घेत पिक विमा योजनेचा विषय मार्गी लावला.
ना सुधीर मुनगंटीवार यांची प्रशासनावरील पकड व संवेदनशील कार्यपद्धती ही सर्व परिचितच आहे; परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सुधीर भाऊ धावून आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *