मुख्यमंत्री ‘शिंदे’ करणार ३ हजार विद्यार्थ्यांचे नेतृत्व..!
By : Shankar Tadas
गडचांदूर : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी हा शासनाचा प्रमुख उद्देश आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन विविध उपक्रम राबवत असतात. शैक्षणिक सत्र २०२४-२५ नुकतेच सुरू झाले असून शासनाने सत्राच्या प्रारंभीच विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्याचे कार्य सुरू केले आहे.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास व्हावा यासाठी शालेय स्तरावर शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात येत आहे. गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे जवळपास ३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेतही शालेय मंत्रिमंडळाची शनिवारी निवडणूक घेण्यात आली. मुख्यमंत्री पदासाठी गायत्री शिंदे ही ५७ टक्के म्हणजेच एकूण ६२३ मतदान घेऊन निवडून आली असून ३ हजार विद्यार्थ्यांचे ती नेतृत्व करणार आहे.
शनिवारी गुगल फॉर्मद्वारे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली असून शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदानासाठी सक्रिय सहभाग घेतला. गायत्री शिंदे ६२३ मते घेऊन मुख्यमंत्री पदी निवडून आली. दिव्या केळझळकर ३९९ मते घेऊन शिक्षण मंत्री, तनुश्री हस्ते ४६९ मते घेऊन सांस्कृतिक मंत्री, देवांशू गोरे ७०२ मते घेऊन क्रीडामंत्री, नम्रता गोरे ५७५ मते घेऊन आरोग्यमंत्री, तन्वी उरकुडे २९५ मते घेऊन स्वच्छता मंत्री, रूपाली कावडकर ६०३ मते घेऊन पर्यावरण मंत्री, वेदांत परसूटकर २१५ मते घेऊन अन्नपुरवठा मंत्री पदी निवडून आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हरिहर खरवडे या शिक्षकाने काम पार पाडले. विजेत्या उमेदवारांचे प्राचार्य साईनाथ मेश्राम यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.