By : Shankar Tadas
कोरपना :
वनसडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत नेहमीच प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.लहानसहान कामासाठी तासन तास थांबावे लागते. अपुरी जागा आणि कमर्चारी कमतरता यामुळे यामुळे बरीच अव्यवस्था बँकेत दिसून येत असूनही अद्याप बँक अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे खातेधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लाडकी बहीण’ या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एक हजार 500 रुपये जमा होणार आहे. या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्ह्यातील अनेक महिलांची बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी तसेच बंद असलेले खाते नव्याने चालू ठेवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे बँक कर्मचार्यांची दमछाक होऊ लागली आहे.
राज्य सरकारने एक जुलैपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणींची गर्दी उसळली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयांसह जिल्ह्यातील सेवा केंद्रामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होत असताना, या योजनेसाठी लागणारे बँक पास बुक झेरॉक्स, खाते क्रमांक आदींची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे काही महिलांनी बँक खाते उघडले नसल्याने त्यांची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत तसेच सरकारी बँकांमध्ये नवीन खाते उघडण्यासाठी महिलांची बँकेसमोर रांग दिसून येत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बँकेसमोर गर्दी होत आहे. तर, यापूर्वी ज्या महिलांनी बँक खाते उघडले होते. परंतु, त्याचा वापर केला नाही. त्यामुळे ते खाते नव्याने चालू ठेवण्यासाठीदेखील महिलांची लगबग सुरु झाली आहेत. त्यासाठी केवायसी करण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे. जिल्ह्यातील अनेक बँकांमध्ये महिलांची गर्दी वाढल्याने बँक कर्मचार्यांची दमछाक होऊ लागली आहे. दैनंदिन कामांबरोबरच या योजनेसाठी नवीन खाते उघडण्यासाठी व बंद असलेले खाते चालू ठेवताना कर्मचार्यांची तारेवरची कसरत होत आहे.
कोरपना परिसरातील बँक ऑफ इंडीया ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे . या शाखेत अपुरी जागा असल्याने व कर्मचारी संख्या कमी असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .सदर बँकेतील कर्मचारी वाढवण्या सोबतच पुरेश्या जागेत बँकेचे व्यवहार झाल्यास ग्राहकांना दिलासा मिळेल.