नेत्रदान मोहीम लोकचळवळ व्हावी : डॉ. प्रफुल्ल खुजे

By : राजेंद्र मर्दाने

वरोरा : ‘अंधत्व ‘ ही सार्वजनिक आरोग्याच्या समस्येपैकी मुख्य समस्या असल्याने अंधारलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश पाडण्यासाठी देशात ‘ मरणोत्तर नेत्रदान ‘ ही मोहीम लोकचळवळ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे यांनी येथे केले. सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉ.आर ए. भालचंद्र याच्या स्मृतीप्रीत्यर्थ उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे आयोजित ‘ दृष्टिदान सप्ताह ‘ कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे नेत्र शल्यचिकित्सक डॉ. वंदेश शेंडे, डॉ. स्नेहाली शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक दारुंडे, नेत्र अधिकारी विवेक मेश्राम, अधिसेविका वंदना बरडे, समाज कार्यकर्ता तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मर्दाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. खुजे पुढे म्हणाले की, नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येक सुजाण नागरिक नेत्रदान करण्यास स्वयंस्फूर्तीने पुढे आल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहीन व्यक्तीला निश्चितच होऊ शकतो. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे नेत्रचिकित्सा शस्त्रक्रियेत राज्यात चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरला असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
डॉ. शेंडे यांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद करीत सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेनुसार ‘ कार्निया ‘ संबंधित आजार हा मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर अंधत्वाच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. संगणक, मोबाईल व अन्य तंत्रज्ञानाचा वापर जपून करावा, असा सल्ला देत डोळ्यांची योग्य निगा न राखल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे, असे ते म्हणाले. जगात अंधांच्या संख्येत वाढ झाल्याने नेत्रांची मागणी वाढली असून त्या तुलनेत नेत्रदात्यांची संख्या खूपच कमी आहे, असे त्यांनी नमूद केले. नेत्रदानासाठी इच्छुक व्यक्तींनी जवळच्या रुग्णालयात संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. शिंदे म्हणाल्या की, देशात जवळपास ६० लाख व्यक्ती दृष्टिहीन असून स्वैच्छिक नेत्रदान करणारे फक्त ४५ हजार आहेत. १० जून या आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने दृष्टिदानाचे उद्दिष्ट व नेत्रदानाने महत्त्व, याबद्दल जनजागृती करुन नागरिकांना दृष्टिदानासाठी प्रवृत्त करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकात वंदना बरडे यांनी नेत्रदान, अवयव दान, रक्तदान इ. बद्दलचे महत्त्व विशद करताना यापूर्वीच त्यांनी स्वतः नेत्रदान, देहदानचा फार्म भरला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी आरोग्य सहाय्यक गुलाब नागोसे, परिसेविका इंदिरा कोडापे, सरस्वती कापटे, रुईकर, तनिष्का खडसाने, नेहा इंदूरकर, लक्ष्मीकांत टाले, कुंदा मडावी, चंदा काळे, पाल, राजपूत, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारीवृंद, नेत्र रुग्ण, सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सोनाली रासपायले यांनी तर आभार प्रदर्शन नेत्र अधिकारी दीपक अंबादे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here