By : Devanand Sakharkar
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला पुराचा इतिहास आहे. येत्या पावसाळ्यात खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या सूचनेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रपूर व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) नागपूर, यांच्या संयुक्त विद्यमानाने पूरप्रवण क्षेत्रातील तालुक्यात मान्सून पूर्वतयारीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
पहिल्या टप्प्यात वरोरा भद्रावती, राजुरा, कोरपना आणि जिवती ह्या तालुक्यातील पूरप्रवण भागातील ग्राम स्तरावर तसेच तालुकास्तरावर असणाऱ्या लोकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणासाठी त्या तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील आणि तालुक्यातील तसेच त्या त्या भागात राहणाऱ्या आपदा मित्रांनाही प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी नागपूर येथील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल (एस.डी.आर.एफ.) दलाचे पोलिस निरीक्षक डी. जी. दाते यांच्यासह 13 लोकांची टीम, राजुराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तालुक्यातील प्रशिक्षणाच्या ठिकाणी संबंधित तहसीलदार योगेश कवटकर (वरोरा), अनिकेत सोनवणे (भद्रावती), प्रकाश व्हटकर (कोरपना) तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख उपस्थित होते.
*अशी आहे तयारी* :
पूरप्रवण भागात अशा प्रकारचे प्रशिक्षण राबवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले होते. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या निर्देशान्वये सदरील प्रशिक्षणाच्या ठिकाणी तालुक्यातील अधिकारी – कर्मचारी व ग्राम स्तरावरील पट्टीचे पोहणारे तसेच त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना बोलावून प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले होते.
यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांना रबर बोट, शोध व बचाव पथकासाठी लागणारे बचाव साहित्य वितरित करण्यात आले. जिल्ह्यांमध्ये सध्या विविध ठिकाणी 28 बोट तैनात आहेत. त्यामध्ये रबर बोट व तसेच एचडीपी बोर्डचा ही समावेश आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पोलिस विभाग व इतर विभागातील प्रशिक्षित शोध व बचाव दल तैनात असून त्यामध्ये प्रशिक्षित बोट चालक व आपत्ती शोध अनुकर्ते शामील आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये 300 आपदा मित्र हे त्यांच्या मदतीसाठी प्रशिक्षण देऊन तयार आहेत.
*या बाबींचे मिळाले प्रशिक्षण* :
या प्रशिक्षणामध्ये बोट चालवणे, बोटवर कशाप्रकारे लोकांना रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं त्याबद्दलची माहिती, तसेच टाकाऊ वस्तुपासून म्हणजेच इम्प्रोवाईज फ्लोटिंग डिव्हाइसेस च्या वापरापासून पुरामध्ये अडकल्यानंतर आपले जीव कसे वाचवायचे व पूर परिस्थितीमध्ये मदत मिळेपर्यंत जीव कसे वाचवायचे याबद्दलचे प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात आले आहे.
*इरई नदीपात्राची सफाई*
: चंद्रपूर महानगरास इराई नदीच्या पाण्यापासून पूर परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी इरई नदी स्वच्छ करण्याचे आदेश दिले होते त्यानुसारच इरही नदी परिसरातील वाढलेली झाडे व झुडपे काढण्याचे काम पूर्ण झालेले आहे.