By : Shankar Tadas
गडचिरोली : स्पार्क अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थी समाजोपयोगी शिक्षण घेत आहे. अनुभवाने परिपूर्ण असलेला हा अभ्यासक्रम विदर्भात आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात राबविला जाणारा गोंडवाना विद्यापीठाचा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आहे. स्पार्क अभ्यासक्रम चार भितींच्या आतील शिक्षण नसून प्रत्यक्ष जिवनातील अनुभव देणारे शिक्षण आहे. विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन व्यसनमुक्तीचे कार्य करण्याची संधी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे. जिल्हयातील युवक-युवती समाजात व्यसनमुक्तीचे धडे देत असून विद्यार्थ्यांचे व्यक्तीत्व समृद्ध करणारा हा अभ्यासक्रम असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.
ग्रामीण समाजात व्यसनांविरुद्ध सामाजिक कार्यक्रमातंर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठ सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेला मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आमुदाला चंद्रमौली, वृक्षमित्र संस्थेचे संस्थापक मोहन हिराबाई हिरालाल, सर्च संस्थेचे सहसंचालक तुषार खोब्रागडे, मुक्तीपथचे प्रभारी संचालक संतोष सावळकर, सकाळ वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी मिलींद उमरे तसेच स्पार्क अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कुलगुरु डॉ. बोकारे म्हणाले, व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनापासून दूर करणे सोपे कार्य नाही. समाजात व्यसनमुक्तीचे कार्य कोणीतरी करत राहणे गरजेचे आहे. यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. व्यसनाचे अनेक प्रकार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दारू व तंबाखूचे व्यसन मोठ्या प्रमाणात आढळून येते. याव्यतिरिक्त बालवयातच मुलांना मोबाईलचे व्यसन देखील जडले आहे. हे देखील एक प्रकारचे व्यसनच असून ज्यामध्ये आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवित असतो. स्पार्क अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीत्व समृद्ध झाले आहे. या व्यक्तीत्वाचा समृद्ध होण्याचा फायदा भावी आयुष्यात निश्चितपणे मिळेल. अनुभव हा कधीही वाया जात नसून कायम पाठीशी असतो. याच अनुभवाच्या आधारे विद्यार्थी भावी आयुष्याची वाटचाल करतील.
स्पार्क हा अत्यंत यशस्वी कार्यक्रम असून तरुण पिढीला समाजाचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासक्रमातून देण्यात येत आहे. एकुण 12 युवक-युवती व्यसनमुक्तीच्या सकारात्मक कार्यात गुंतून आहे, हे विद्यार्थी समाजासाठी आशेचा किरण असल्याचे कुलगुरु डॉ. बोकारे म्हणाले.
ग्रामसभा अधिक मजबुत करण्यासाठी कायद्याची जोड आवश्यक – मोहन हिरालाल
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना प्रमुख वक्ते मोहन हिरालाल म्हणाले, गडचिरोली जिल्हा हा देशातील पहिला असा जिल्हा आहे, ज्यांनी आंदोलन करुन जिल्ह्यात दारुमुक्ती घडवून आणली. दारु ही समाजाला, लोकांना घातक आहे, हा विचार करुन गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्यक्ष 150 गावातील ग्रामसभांनी स्वत: ठराव घेवून गावात दारुबंदी केली असल्याचे मोहन हिरालाल यांनी सांगितले. वनहक्क कायदा, ग्रामदान कायदा, गौण वनउपज, जैवविविधता, रोहयो आदी कायद्यांचे महत्व, गावातील दारुबंदी सर्वसहमतीने निर्णय, पेसा कायद्यातून स्वयंशासन आदीबाबत वृक्षमित्र संस्थेचे संस्थापक मोहन हिराबाई हिरालाल यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच व्यक्ती व्यसनमुक्त व्हावा हे महत्वाचे असून व्यसनामुळे युवकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. व्यसनाला पाठींबा, प्रोत्साहन देण्याची बाब बदलायला हवी. गांधीजीनी ग्रामस्वराज्याची संकल्पना मांडली तर विनोबांनी ग्रामस्वराज्य म्हणजे काय याचे शास्त्र मांडले. तसेच अभ्यास, निर्णय आणि कृती केल्यास गाव स्वयंभू होईल, या आधारावरच देश स्वावलंबी होईल. ग्रामसभा अधिक मजबुत करण्यासाठी पेसा, ग्रामसभा, वनहक्क कायदा, ग्रामदान कायदा, गौण वनउपज, जैवविविधता, रोहयो आदी कायद्याची जोड आवश्यक असल्याचे मोहन हिरालाल म्हणाले.
यावेळी, स्पार्क अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात केलेल्या कार्याचे उत्कृष्ठ सादरीकरण केले. दुपारच्या सत्रात सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मिलींद उमरे यांनी व्यसनमुक्तीसाठी मिडीया व बातम्या यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन आदर्श पदवी महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर तर आभार सर्च संस्थेचे सहसंचालक तुषार खोरगडे यांनी मानले. तत्पुर्वी कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन करण्यात आली.