लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा-गोंडवाना विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी सिनेट सदस्य,विविध प्राधिकरणाचे सदस्य व प्राध्यापकाच्या प्रवास भत्ता व परीक्षा संबंधी देयकांची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात वळती न करता स्वतःच्या खात्यात वळती करून 1.46 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघडिस आले असून यासंदर्भात विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांचे कडे करण्यात आलेली आहे.
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी निवेदन व चर्चेच्या माध्यमातून प्राध्यापकांचे प्रवास संबंधी आणि परीक्षेसंबंधी कामाची देयके विद्यापीठांमध्ये प्रलंबित असल्याचे व प्राध्यापकांना प्राप्त न झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते व यासंदर्भात सिनेटमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला होता त्यामुळे 2018 पासूनच्या प्रलंबित देयकांचे शोधन करून प्राध्यापकांना कामाचे मानधन व प्रवास भत्ता दिलेला होता मात्र बऱ्याच प्राध्यापकांची परीक्षा कामाचे देयके व प्रवास देयके प्रलंबित असल्याचे संघटनेने विद्यापीठाला वारंवार लक्षात आणून दिलेले होते मात्र विद्यापीठाने या संदर्भात दुर्लक्ष केले होते.
अनेक प्राध्यापकांच्या विविध कामाच्या बिलाची देयके वित्त व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी परस्पर स्वतःच्या खात्यात वळती करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब उघडीस आलेली असून यासंदर्भात सदर आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करून सर्व दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून प्राध्यापकांचे प्रलंबित देयकांची चौकशी करून ते लवकरात लवकर अदा करण्याची मागणी सुद्धा संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे तसेच प्राध्यापक व विविध प्राधिकरणातील सदस्य यांच्या प्रवास भत्ता, दैनिक भत्ता व विविध मानधना बाबतची देयके विद्यापीठांमध्ये सादर केल्यानंतर मागणी करूनही त्यांची पोचपावती दिली जात नाही या संदर्भात संघटनेने भूमिका घेतली असून उपरोक्त सर्व प्राध्यापकांना वेळोवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रवास किंवा परीक्षा संदर्भात देयकांची पोचपावती त्वरित देण्याची सुद्धा मागणी संघटनेच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ.विवेक गोरलावार व पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंकडे केलेली आहे.