By : Rajendra Mardane
चंद्रपूर : कापूस पिकाचे बोगस, अनाधिकृत बियाणे, बिजी-3, आर.आर.बी.टी., एच.टी.बी.टी. या नावाने अनोळखी व्यक्तीकडून शेतकऱ्यांना कापूस बियाण्याची विक्री होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा अनाधिकृत विक्रेत्यांकडून सावध राहावे, असे आवाहन भद्रावती तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव तालुका व पंचायत समितीचे कृषी अधिकारी जयंत धात्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, सदर बियाणे हे जमिन, पर्यावरण व आरोग्यास अत्यंत घातक आहे. बेकायदेशीर रित्या विक्री होणाऱ्या बियाण्यांच्या पॉकीटावर कोणत्याही प्रकारचे वाण, तंत्रज्ञान किंवा शिफारस यांची माहिती नसते. या बियाण्यावर तणनाशकाची फवारणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे कॅन्सर व मुत्रपिंडाचे आजार होतात. पर्यायाने शेतीचे व पर्यावरणाचे नुकसान होउन मानवी आरोग्यास हानी पोहचते. अनाधिकृत बोगस बियाण्याचे पक्के देयक देण्यास येत नसल्यामुळे फसवणुक झाल्यास कोणतीही भरपाई मिळत नाही. शेतक-यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करतांना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या परवानाधारक अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. कोणत्याही खाजगी व्यक्तीकडून बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करू नये व अशा अमिषाला बळी पडू नये. निविष्ठा खरेदी करतांना पॉकिटे, पिशव्या, बाटल्या मोहरबंद असल्याची खात्री करावी.बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकीटावरील अंतीम मुदत पाहुनच खरेदी करावी. पक्के बिल घेण्यास टाळाटाळ करू नका. किटकनाशके अंतीम मुदतीचे आतील असल्याची खात्री करावी. कृषी निविष्ठाबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार निवारण कक्ष पंचायत समिती, कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचे कडे लेखी तक्रार नोंदवावी, असे कृषी अधिकारीद्वय यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.